सामान्यांना असलेली लांडग्याची ओळख म्हणजे लहानपणी ऐकलेली ‘लांडगा आला रे आला’ ही गोष्ट किंवा एखाद्याला दिलेली ‘लबाड लांडग्या’ची उपमा! लांडग्याचा हा संकुचित परिचय विस्तारून लांडगा, गवताळ प्रदेश आणि माणूस यांचे बहुपदरी नाते उलगडण्यासाठी वन्यजीव विभागासह वन्यजीवविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत.
राज्याचा वन विभाग, पुण्याचा वन्यजीव विभाग आणि काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे लांडग्याविषयीची व्यापक माहिती संकलित करण्यासाठी ‘ओवीतला लांडगा’ हा प्रकल्प सुरू केला असून त्याच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शुक्रवारी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. अंतरा, ओईकॉस, बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाईल्डलाईफ कान्झव्र्हेशन सोसायटी, नेचर वॉक या संस्था आणि काही निसर्ग अभ्यासक या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. हा प्रकल्प पुढील एक वर्ष (सप्टेंबर २०१४ ते ऑगस्ट २०१५) चालणार असून त्यात लांडग्याचा वावर असलेल्या गवताळ प्रदेशांमध्ये फिरून, तिथल्या धनगरांशी बोलून लांडग्यांविषयी माहिती संकलित केली जाणार आहे. मिळणारी माहिती दर महिन्याला http://www.ovitla-landga.inया संकेतस्थळावर उपलब्धही करून दिली जाणार आहे.
लांडगा हा गवताळ प्रदेशावरील प्रमुख शिकाऱ्यांपैकी एक असून पुणे, सातारा, नगर, सोलापूर अशा कोरडय़ा प्रदेशात तो आढळतो. वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये म्हणाले, ‘‘गवताळ भागातील धनगर समाज आणि लांडगा यांचे नाते वेगळ्या प्रकारचे आहे. या धनगरांच्या जनावरांपैकी एखादे लांडग्याने मारले तरीही हे लोक त्यासाठी कधीही भरपाई मागायला येत नाहीत. लांडग्याला रोजच्या जीवनाचा भाग मानण्याच्या या वृत्तीचा अभ्यास या प्रकल्पात करता येईल. तसेच, कोरडय़ा भागात राबवल्या गेलेल्या सिंचन प्रकल्पांमुळे तिथल्या परिसंस्थेत काही बदल झाला का हेही अभ्यासता येईल. गवताळ प्रदेश निरूपयोगी नसून या प्रदेशांचे रक्षण करणे आवश्यक आहे. लांडग्याबरोबर गवताळ भागात आढळणाऱ्या इतरही प्राण्यापक्ष्यांची माहिती संकलित केली जाईल.’’
सहायक वनसंरक्षक कीर्ती जमदाडे, निसर्ग शिक्षणातील तज्ज्ञ अनुज खरे आणि बिबटय़ावरील अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या वाईल्डलाईफ कान्झव्र्हेशन सोसायटीच्या विद्या अत्रेय या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम करणार असून वन्यजीव अभ्यासक गिरीश पंजाबी, त्रिशांत सिमलई, सायली पाळंदे- दातार, नित्या घोटगे, केतकी घाटे, अपर्णा वाटवे, प्रमोद पाटील आणि वन्यजीवशास्त्राच्या काही विद्यार्थ्यांचाही प्रकल्पात सहभाग आहे.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित