‘सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्या संपर्कात राहायचे, चॅट करायचे. तर त्यासाठी एका संकेतस्थळावर अकाउंट. व्यावसायिक ओळखी, कार्यालयातील ओळखी यांसाठी दुसरे संकेतस्थळ.. मात्र, आता ‘प्रोशल’ म्हणजे सोशल, प्रोफेशनल नेटवर्किंग साइट. वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधातील सगळ्यांशी एकाच अकाउंटवर पण तरीही स्वतंत्रपणे संपर्कात राहता येणार आहे.
पुण्यातील रोहन ठुसे आणि त्यानी स्थापन केलेल्या अ‍ॅक्टिव्ह थॉट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘प्रोशेल’ ही3-rohan संकल्पना राबवणारी ‘रायपेन’ हे संकेतस्थळ सुरू केले आहे. रायपेनवर सोशल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही संबंधातील व्यक्तींच्या संपर्कात राहता येणार आहे. मात्र, तरीही हे दोन्ही ग्रुप्स, त्यासाठीची प्रोफाइल्स स्वतंत्र ठेवता येणार आहेत. एकीकडे मित्रांशी चॅट करताना त्याचवेळी व्यावसायिक संबंधातील एखादी मिटिंगही या संकेतस्थळाच्या माध्यमातून करता येणार आहे.
या शिवायही या संकेतस्थळाची वैशिष्टय़े आहेत. लॉग इन केल्यानंतर सकाळ, दुपार अशा वेळेनुसार संकेतस्थळ तुम्हाला शुभेच्छा देते. ‘ई-गव्हर्नन्स’ हे या संकेतस्थळाचे आणखी एक वैशिष्टय़. बातम्या, शासकीय निवेदने, महत्त्वाच्या संकेतस्थळांची माहिती वेळोवेळी मिळणार आहे. काम करत असताना ही माहिती किंवा मित्र-मैत्रिणींचे फिड, वाचण्यासाठी वेळ नसेल, तर ती ऐकण्याची सोय ‘स्पिक अप’ च्या माध्यमातून करण्यात आली आहे. एखादी गोष्ट आवडली किंवा पटली तर ते दाखवण्यासाठीचा सोशल नेटवर्किंग साइटवरील पर्याय म्हणजे ‘लाइक’. या लाइकऐवजी वेगवेगळ्या भावना दाखवणारे चेहऱ्यांचा पर्याय या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.
सध्या बिटा प्रकारात हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या फक्त ओळखीतून पुढे निमंत्रित केलेल्यांनाच या संकेतस्थळाचा भाग होता येणार आहे. या संकेतस्थळाला महिनाभरात ३ हजार नेटकरांनी नोंदणी केली आहे. या महिनाअखेरीला हे संकेतस्थळ नियमित सुरू होणार असून पुढील दोन ते तीन महिन्यांत इतर सर्व सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांप्रमाणेच ते सर्वासाठी खुले करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘रायपेन’चे मोबाइल अ‍ॅप्लिकेशनही सुरू करण्यात येणार असल्याचे रोहन याने सांगितले.
‘प्रत्येक माणसाबरोबरचे नाते वेगळे असते. सगळ्या प्रकारच्या नात्यांना एकत्र बांधण्याबरोबरच ती स्वतंत्र ठेवणे ही आवश्यक असते. सोशल नेटवर्किंग साइटवर व्यावसायिक संबंधातील लोक असतील, तर आपल्याला जे वाटते, ते शेअर करण्यावर बंधने येतात. प्रोफेशनल नेटवर्किंग साइट्सवर सोशल नेटवर्किंगची मजा घेता येत नाही. त्यामुळे हे दोन्ही एकत्र करण्याची संकल्पना सुचली,’ असे रोहन याने सांगितले.