राज्यातील आणि बृहन् महाराष्ट्रातील साहित्य संस्थांची शिखर संस्था असा लौकिक असलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा इतिहास प्रथमच संकेतस्थळावर शब्दबद्ध होणार आहे. महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ सदस्य प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्याकडे हे काम सोपविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
जीवनाच्या सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होत असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पत्रव्यवहाराच्या जगामध्ये असल्याची टीका होत होती. एवढेच नव्हे तर, साहित्य महामंडळाचे स्वतंत्र संकेतस्थळ देखील अस्तित्वात नव्हते. मुंबई मराठी साहित्य संघाच्या संकेतस्थळावर साहित्य महामंडळाची माहिती देणारे एक पान अस्तित्वात होते. ही बाब ‘लोकसत्ता’ने नजरेस आणून दिल्यानंतर साहित्य महामंडळाचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये या संकेतस्थळासाठी प्राथमिक स्वरूपाची गरज म्हणून ५० हजार रुपयांची तरतूद करण्याबरोबरच महामंडळाच्या इतिहासाचे लेखन करण्याची जबाबदारी ठाले-पाटील यांच्यावर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.
साहित्य महामंडळाच्या स्थापनेला ५० वर्षे उलटून गेली असताना इतिहासलेखनाचे काम प्रथमच केले जात असल्याची माहिती कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. महामंडळाच्या स्थापनेपासूनची सर्व माहिती माझ्याकडे आहे. काही वर्षांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वार्षिकांकासाठी महामंडळाच्या कार्याविषयीचा लेख लिहिला होता. त्याचप्रमाणे महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर रसाळ यांच्याकडूनही विस्तृत माहिती घेण्यात येणार आहे. आतापर्यंत महामंडळाने केलेली कामे, विविध टप्प्यांवर झालेले बदल अशा पद्धतीने लेखन करण्यात येणार आहे. राज्यातील वाङ्मय क्षेत्रामध्ये झालेल्या घडामोडी युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे इतिहास लेखन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
काय असेल संकेतस्थळामध्ये
– साहित्य महामंडळाच्या स्थापनेचा इतिहास
– महामंडळाच्या घटक, संलग्न आणि समाविष्ट संस्थांची माहिती
– दर तीन वर्षांनी बदलणाऱ्या कार्यालयासंबंधीची माहिती
– मराठी भाषा आणि साहित्य या विषयामध्ये महामंडळाने वेळोवेळी घेतलेली भूमिका