News Flash

करोनामुळे ठरलेले मुहूर्त रद्द करून लग्नसोहळे लांबणीवर

वातावरण सुरळीत झाल्यानंतरच निर्णय होणार

वातावरण सुरळीत झाल्यानंतरच निर्णय होणार

पिंपरी : करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा फटका यंदाच्या लग्नसराई हंगामालाही बसला आहे. दणक्यात बार उडवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांना यापूर्वी ठरलेले मुहूर्त रद्द करून अनिश्चित काळासाठी लग्नसोहळे लांबणीवर टाकण्याचा पर्याय नाइलाजाने निवडावा लागला आहे.

गेल्या १३ महिन्यांपासून करोना रुग्ण आढळून येत आहेत. मधला काळ वगळता करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले. एक मेपर्यंत टाळेबंदी घोषित केली. या वातावरणाचा फटका सर्वानाच बसला असून लग्नसराईचा हंगाम त्यातून सुटलेला नाही.

करोनामुळे गेल्या वर्षीच्या लग्नसराई हंगामाचे बरेच नुकसान झाले. यंदा गतवर्षीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. मार्चपासून सुरू होणारे लग्नसोहळे एप्रिल, मे आणि जून महिन्यातील सुरुवातीचे काही दिवस चालतात. यंदा मुलाचे घरातील कार्य उरकायचे म्हणून काही महिन्यापूर्वीच तारखा आरक्षित करून ठेवलेल्या कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली होती. प्रत्यक्षात, वेळ जवळ आली, तेव्हा करोनामुळे परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती. सध्याच्या वातावरणात मनासारखा लग्नसोहळा होणे अवघड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी ते लांबणीवरच टाकण्याचा मार्ग स्वीकारला.

लग्नासाठी यापूर्वी ५० जणांची उपस्थिती बंधनकारक होती. आता ती २५ आहे.  दोन्हीकडील जवळचे नातेवाईक, मित्र परिवाराला विवाहासाठी आमंत्रित करणे अनिवार्य आहे. त्यामुळे अत्यल्प मर्यादेत लग्नसोहळे घेता येत नाहीत. मोठय़ा घराण्यांमध्ये हजारोंची उपस्थिती लौकिकाचा भाग मानला जातो. निर्बंधांत कोणत्याही प्रकारची हौसमौज, भव्य-दिव्य काही करता येणार नाही. त्यापेक्षा ते लांबणीवर टाकण्याचा निर्णय बहुतांश कुटुंबांनी घेतला आहे. नाइलाज असणाऱ्यांनी करोनचे सर्व नियम पाळून मोजक्या उपस्थितीत लग्न उरकून घेण्याची मानसिकता ठेवली आहे.

लग्नासाठी पूर्वी आरक्षित केलेल्या तारखा अनेक कुटुंबीयांनी रद्द केल्या आहेत. एप्रिल, मे महिन्यातील हंगामात आमच्याकडे साधारणपणे १५० लग्नसोहळे होतात. यंदा बोटावर मोजता येईल, इतकेच सोहळे आहेत. जेमतेम २५ जणांच्या उपस्थितीत लग्नाचा खर्च करण्यापेक्षा परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर मनासारखा सोहळा करण्याचा संबंधित कुटुंबीयांचा विचार आहे.

– प्रसाद मोरे, हॉटेल व्यवस्थापक, पिंपरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 2:19 am

Web Title: wedding ceremonies postponed due to corona zws 70
Next Stories
1 मार्केट यार्डात गर्दी; पोलीस आयुक्तांकडून नाराजी
2 श्रीमंत महेंद्र पेशवा यांचे निधन
3 दस्त नोंदणीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत
Just Now!
X