आपल्याकडे विवाह सोहळ्यांमध्ये २५ कोटी रुपये देखील खर्च होतात. मात्र, हजार रुपयांसाठी शेतकरी आत्महत्या करतो, या समाजातील विसंगतीवर आध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज यांनी चिंचवडला बोलताना बोट ठेवले. भारतीय संस्कृती आदर्शाची आहे. हजारो वर्षे गुलामीत गेली, अनेकांची आक्रमणे झाली. मात्र, आपली संस्कृती टिकून राहिली, त्याचे कारण ती श्रीरामाची व आदर्शाची संस्कृती होती, अशी टिप्पणी त्यांनी केली.
हिंदूू स्वाभिमान प्रतिष्ठानचा ‘प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती पुरस्कार’ यंदा मराठवाडा युवा मंचाचे अध्यक्ष सत्यजित चौधरी यांना भैय्यू महाराजांच्या हस्ते देण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, अनिल शिरोळे, आमदार लक्ष्मण जगताप, संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पं. धर्मवीर आर्य, उमेश पाटील, घनश्याम शेलार, राहुल कलाटे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
भैय्यू महाराज म्हणाले, सध्याचे युग ज्ञानाचे आहे. आपल्याकडे संपत्ती, सौंदर्य, विद्वत्ता आली, ज्ञानामुळे आपण अंतराळात गेलो, संगणक क्षेत्रात भरारी घेतली. तरीही शेतकरी आत्महत्या का करतो, औषधे मिळत नाहीत म्हणून लहान मुले दगावतात, महिलांवर अत्याचार होतात, मुली विकल्या जातात. पबमध्ये लाखो रुपये खर्च होतात, मात्र शिक्षणासाठी दहा रुपयेही मिळत नाहीत. लग्नांमध्ये कोटय़वधी खर्च होतात. मात्र हजार रुपयांसाठी शेतकरी आत्महत्या करतो. राष्ट्राला जगवण्यासाठी सर्वप्रथम माणुसकी जगली पाहिजे. त्याच्या जागी आपण असतो तर, हा विचार करून गरजवंतांना मदत केली पाहिजे. हिंदूुत्व म्हणजे सर्वाना समान तसेच सन्मानाची वागणूक देणे होय. आचरणातील शुध्दता, पावित्र्याचा संकल्प, सहिष्णुतेचे आचरण, एकनिष्ठ चरित्र म्हणजे हिंदूुत्व. तरुणांमध्ये क्रांती घडवण्याची ताकद आहे. त्यांनी दुतोंडी माणसे ओळखून खरे आदर्श समाजापुढे आणले पाहिजेत. प्रास्ताविक उत्तम दंडिमे यांनी केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.