एका लग्नावर जास्तीत जास्त किती खर्च होऊ शकतो?.. लग्नाच्या खर्चाचे आकडे आता केवळ लाखांमध्ये मर्यादित राहिलेले नाहीत. ‘शाही’ लग्नाचा आग्रह आता पुण्यातही जोर धरू लागला आहे. पुण्यातील स्टार हॉटेल्समध्ये होणाऱ्या विवाहसोहळ्यांच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढ झाली असून या विवाहसोहळ्यांच्या खर्चाचे आकडे सहज कोटींमध्ये खेळू लागले आहेत.   
स्टार हॉटेल्समध्ये ‘शाही’ विवाहसोहळा करणाऱ्यांच्या संख्येत गेली तीन वर्षे लक्षणीय वाढ होत असल्याचे निरीक्षण काही हॉटेल व्यवस्थापकांनी नोंदवले आहे. ‘जेडब्ल्यू मॅरियट’ या हॉटेलचे विक्री संचालक अभिजित चिटणीस म्हणाले, ‘‘३-४ वर्षांपूर्वी स्टार हॉटेलमध्ये लग्न करण्याचा ट्रेंड दिसत नव्हता. २०११ पासून तो विशेष लक्षात येत आहे. २०११ मध्ये मॅरियटमध्ये ४० लग्ने झाली होती. २०१२ मध्ये ही संख्या ८५ झाली, तर गेल्या वर्षी ती १२५ वर गेली आहे. पुण्यातील जैन, मारवाडी, सिंधी, गुजराती समाजाचे लोक अशा शाही विवाहांना विशेष पसंती देत असल्याचे दिसून येते. या समाजाच्या लग्नामध्ये पाहुण्यांची संख्या खूप मोठी आहे. अशा विवाहसोहळ्यांसाठी आम्ही एका वेळी ८०० ते २००० लोक बसू शकतील असे मोठे वातानुकूलित सभागृह उपलब्ध करून देतो. संगीत, मेंदी, लग्न, रिसेप्शन अशा २-३ दिवस चालणाऱ्या एका लग्नासाठी सर्वसाधारणपणे १५ ते २५ लाख रुपयांपासून खर्च येतो. काही वेळा नवरा-नवरीपैकी कुणीतरी पुण्याबाहेरील असते तेव्हा वऱ्हाडाला राहण्यासाठी हॉटेलमध्ये खोल्याही घेतल्या जातात. अशा वेळी लग्नाचा खर्च १.५ ते २ कोटी रुपयांपर्यंतही जातो. विवाहेच्छूंच्या मागण्यांनुसार खर्चात बदल होतो.’’
केवळ पुणेकरच नव्हे तर कोल्हापूर, नागपूरसारख्या ‘बी’ आणि ‘सी’ ग्रेड शहरांमधूनही केवळ शाही लग्नासाठी लोक पुण्याला पसंती देत असल्याची माहिती हॉटेल वेस्टिनचे फूड अँड बिव्हरेज संचालक देवेश रावत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘बी आणि सी ग्रेड शहरांमधून अनेक जण पुण्यात स्टार हॉटेलमध्ये लग्न करण्यासाठी येतात. गेल्या दोन वर्षांत वेस्टिनमध्ये शाही लग्नाच्या व्यवसायात ३० टक्क्य़ांची वाढ झाली आहे.’’
मॅरियटचे चिटणीस म्हणाले, ‘‘आलेल्या ग्राहकाला एकाच छताखाली सर्व गोष्टी मिळाव्यात याची काळजी आम्ही घेतो. नवऱ्या मुलाकडच्यांना लग्नाच्या जेवणात मेक्सिकन अन्नपदार्थ हवे असतात तर मुलीकडच्यांना लेबनीज अन्नपदार्थ हवे असतात. अशा वेगळ्या आवडीनिवडींसाठी आमच्याकडे ते-ते प्रादेशिक अन्नपदार्थ बनवणारे ११ शेफ नियुक्त केले आहेत. प्रत्येक लग्न ‘टेलरमेड’ असल्यामुळे त्या प्रमाणात येणारा खर्चही वेगळा असतो.’’    
 
पत्रिकेपासून मधुचंद्रापर्यंत!
विवाहेच्छूंच्या सगळ्या मागण्या पुरवण्यासाठी मोठी हॉटेल्स ‘वेडिंग प्लॅनर’ही बनली आहेत. ‘तुम्ही फक्त पैशांची तयारी ठेवा बाकी सगळे आम्ही पाहून घेऊ,’ या थाटात विवाहसोहळ्यासाठी आलेल्या ग्राहकाची पत्रिका छापणाऱ्यांपासून लग्नानंतर पाहुण्यांना देण्यासाठीची ‘रिटर्न गिफ्ट्स’ सजवून देणाऱ्यांपर्यंतच्या व्यावसायिकांशी हॉटेलवालेच गाठ घालून देत आहेत. मेंदी काढून देणारे, चुडीवाले, नवऱ्या मुलीचा आणि इतर वऱ्हाडींचा मेकअप करून देणारे, नवरा-नवरी आणि अगदी जवळच्या नातेवाईकांना ‘डिझायनर’ कपडे शिवून देणारे, ‘डिझायनर’ लग्नपत्रिका बनवून देणारे, आहेराची ताटे आणि भेटवस्तू कलात्मकपणे सजवणारे, वातानुकूलित सभागृहातच वेगळा शाही मंडप घालून देणारे असे सर्व व्यावसायिक स्टार हॉटेल्सकडे बांधलेले असून आलेल्या ग्राहकांची त्यांच्याशी भेट घालून दिली जात आहे. इतकेच नव्हे तर मधुचंद्रासाठी टूर बुकिंगपर्यंतच्या सेवा काही स्टार हॉटेल्स पुरवत आहेत.