‘वीकेंड’ कसा घालवायचा, असा प्रश्न पडलेल्या ‘बक्कळ कमावत्या’ पुणेकरांना आता सुट्टी घालवण्यासाठी पुण्याच्या बाहेर पडण्याचीही गरज उरलेली नाही. शहरापासून अगदी २०-२५ किलोमीटरवर तब्बल ३५ ते ४० आलीशान ‘रीसॉर्ट्स’ त्यांच्या दिमतीला उभी राहिली आहेत. गेल्या १० ते १२ वर्षांत रीसॉर्ट्सचा हा उद्योग पुण्यात चांगलाच बहरला असून सध्या या उद्योगाची वार्षिक उलाढाल २१० ते २४० कोटींच्या घरात गेली आहे. रीसॉर्ट क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी हे निरीक्षण नोंदवले आहे.
माहिती तंत्रज्ञानाबरोबरच उद्योगाचे शहर म्हणून नावारूपाला आलेले पुणे आता ‘पिकनिक रीसॉर्ट्स’चे शहर म्हणूनही वेगाने विकसित होत आहे. ‘वीकेंड पिकनिक’ चे आकर्षण बनलेली ही रीसॉर्ट्स प्रामुख्याने बावधन, मुळशी, दक्षिण पुणे, हडपसर- सासवड रस्ता आणि उपनगर भागात आहेत. यातील बहुतेक रीसॉर्ट्स कुठली तरी ‘थीम’ डोळ्यांसमोर ठेवून बांधली गेली आहेत. बाली, ट्रॉपिकल, पारंपरिक महाराष्ट्रीयन, पारंपरिक राजस्थानी अशा या थीम्स आहेत.
बावधनमधील अँब्रोशिया रीसॉर्टच्या व्यवस्थापकीय संचालक महुआ नारायण म्हणाल्या, ‘‘पुण्यात सध्या साधारणपणे ३५ ते ४० रीसॉर्ट्स आहेत. बावधन, मुळशी आणि उपनगर भागात रीसॉर्ट्सची संख्या अधिक आहे. यातील प्रत्येक रीसॉर्टची वार्षिक उलाढाल सुमारे ६ कोटी रुपयांच्या आसपास आहे. रीसॉर्टमध्ये येणारे ७५ ते ८० टक्के लोक पुणेकरच असल्याचा आमचा अनुभव आहे. रोजच्या पदार्थापेक्षा वेगळे मल्टी कुझीन पदार्थ चाखून बघण्यास लोक उत्सुक असतात. आम्ही अवधी, इस्लामिक अरेबियातील बुखारा, मोगलाई असे वेगवेगळ्या पद्धतींचे पदार्थ बनवतो. वेगवेगळ्या पदार्थाबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्सही सादर केल्या जातात.’’
‘वीकेंड’ बरोबरच २-३ दिवसांच्या लहान सहलीसाठी या रीसॉर्ट्समध्ये आकर्षक ‘पॅकेजेस’ उपलब्ध आहेत. बहुतेक रीसॉर्ट्सच्या स्वत:च्या वेबसाईट्सवर या पॅकेजेसची इत्थंभूत माहिती मिळते. यातील दोन व्यक्तींसाठी एक व दोन रात्री राहण्याची पॅकेजेस पाहता ती साधारणपणे १० हजार रुपयांपासून १७ हजार रुपयांपर्यंत आहेत. ‘स्पा’ हे रीसॉर्ट्सचे आणखी एक वैशिष्टय़ बनले असून या स्पामधील सुविधांसाठी वेगळे पैसे भरावे लागत आहेत. हे स्पा देखील आता केवळ मसाजसाठी मर्यादित राहिलेले नाहीत. हॉट स्टोन मसाजसारख्या काही वेगळ्या मसाज पद्धती आणि ऑर्गानिक फेशियलसारखे सौंदर्योपचार यांचाही त्यात समावेश झाला आहे.
रीसॉर्ट्स आणि खेळ
स्पाबरोबर तरुणांसाठी वेगवेगळे खेळ खेळण्याची संधीही अनेक रीसॉर्ट्समध्ये उपलब्ध करून दिलेली दिसते. मोठय़ा माणसांसाठीच्या खेळांबरोबरच लहान मुलांसाठी वेगळा ‘प्ले एरिया’ ही बऱ्याच रीसॉर्ट्समध्ये पाहायला मिळतो. पुण्यातील बऱ्याचशा रीसॉर्ट्समध्ये हे खेळ खेळण्याची संधी ग्राहकांना मिळते- टेनिस, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, टेबलावरील दांडय़ांच्या साहाय्याने सोंगटय़ा हलवण्याचा ‘फूसबॉल’ हा खेळ, पूल टेबल, बिलियर्ड्स, क्रिकेट, तंबोला, पत्ते. यातील ठराविकच खेळांचा पॅकेजेसमध्ये अंतर्भाव असतो. बिलियर्ड आणि क्रिकेटसारख्या खेळांना वेगळे पैसे भरावे लागतात.
‘पॅकेजेस’ ची आकर्षणे
रीसॉर्ट्समध्ये राहण्यासाठी उतरल्यावर लगेच सव्र्ह केल्या जाणाऱ्या थंड पेयापासूनच पॅकेजमधील आकर्षणांना सुरुवात होते. ‘पर्सनलाईज्ड’ बटलर सेवा, खोलीत फळे, वैविध्यपूर्ण बिस्किटे, चॉकलेट्स यांची रेलचेल, मल्टी कुझीन न्याहरी व जेवण, बेड टी, स्वीमिंग पूल किंवा ‘जकूझी’ ची (पाण्यात पाय सोडून बसण्याचे कुंड) सुविधा, वेगवेगळ्या वाईन्सची चव चाखण्याचा अनुभव, तासाच्या भाडय़ावर उपलब्ध होणारा स्वीमिंग पूल, फिटनेस क्लब, ग्रंथालय या सर्व सुविधा ग्राहकांना वेड लावत आहेत.