19 September 2020

News Flash

अमूर्त शैलीचे प्रसिद्ध चित्रकार विजय शिंदे यांचे निधन

अमूर्त शैलीतील प्रसिद्ध चित्रकार विजय महादेव शिंदे (वय ५४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले.

| October 1, 2013 02:35 am

 अमूर्त शैलीतील प्रसिद्ध चित्रकार विजय महादेव शिंदे (वय ५४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
विजय शिंदे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्य़ातील कुर्डुवाडी येथे १९५९ मध्ये झाला. मुंबई येथील जे. जे. कला महाविद्यालयातून त्यांनी जी. डी. आर्ट ही कला पदविका संपादन केली. आधुनिक कला (मॉडर्न आर्ट) आणि समकालीन कला (कंटेम्पररी आर्ट) यांच्या मिलाफातून त्यांनी स्वत:ची चित्रशैली विकसित केली होती. १९८४ मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर, भोपाळ येथील भारत भवन संस्थेच्या शिष्यवृत्तीचे ते मानकरी होते. मुंबई, भोपाळ आणि दिल्ली येथे त्यांची चित्रप्रदर्शने भरली होती. चिली देशातील ‘सँटियागो बिएनाल’ या द्वैवार्षिक प्रदर्शनातही शिंदे यांचा १९८७ आणि १९८९ असा दोनदा सहभाग होता.
कला शिक्षण मुंबईमध्ये घेतलेल्या शिंदे यांनी आपली कारकीर्द पुण्यातच घडविली. पुण्यामधील चित्रकारांसाठी ते सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असत. त्यांच्यामुळेच एस. एच. रझा, तैय्यब मेहता आणि एम. एफ. हुसेन हे चित्रकला प्रांतातील दिग्गज पुण्याला येऊ लागले. चित्रकार मित्रांसमवेत शिंदे यांनी ‘इन्फॉर्मल आर्ट ग्रुप’ची स्थापना केली होती. सर्व चित्रकारमित्रांनी चित्रे चितारून सारसबागेमध्ये पिकासो यांचा वाढदिवस साजरा केला होता. मुंबई बॉम्बस्फोटानंतर १५ फूट बाय ४५ फूट आकारातील कॅनव्हासवर चित्रकारांनी कलाविष्कार साकारून या घटनेविषयीच्या संवेदना व्यक्त केल्या होत्या. माँ अमृतानंदमयी, ओशो रजनीश, दलाई लामा आणि नित्यानंदमहाराज या आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचा स्नेह होता. वैकुंठ स्मशानभूमी येथे शिंदे यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी प्राचार्य दिनकर थोपटे, मुरली लाहोटी, पांडुरंग ताठे, विवेक खटावकर उपस्थित होते.
प्रसिद्ध चित्रकार अतुल दोडिया हे विजय यांचे वर्गमित्र. ‘विजयचे आणि माझे अगदी छान जमायचे. एक वर्ष तो घाटकोपरच्या वसतिगृहामध्ये राहायला असल्याने आम्ही सतत बरोबर असायचो,’ अशा शब्दांत दोडिया यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 2:35 am

Web Title: wellknown painter vijay shinde passed away
Next Stories
1 ‘स्वच्छ’ची सेवा थांबवून कचरा व्यवस्थापन टेंडर प्रक्रियेद्वारे करण्याचा विद्यापीठाचा निर्णय
2 दिवाळीसाठी एसटीकडून अडीच हजार जादा गाडय़ा
3 पुण्यातील केबल प्रक्षेपण बुधवारी सायंकाळी ६ ते ९ काळात बंद राहणार
Just Now!
X