राज्यसभेच्या जागांसाठी भाजपामध्ये रस्सीखेच होणार असंच दिसून येतं आहे. कारण उदयनराजे भोसले यांचं भाजपासाठीचं योगदान काय असा प्रश्न आता भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडेंनी विचारला आहे. मी त्यांच्यापेक्षा पक्ष वाढीला लागावा म्हणून जास्त प्रयत्न केले आहेत असंही संजय काकडे यांनी म्हटलं आहे. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाकडून उदयनराजे यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी टीका केली आहे.

संजय काकडे यांनी उदयनराजेंविरोधात भूमिका घेतल्याने भाजपात आश्चर्य व्यक्त होतं आहे. सातरा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. त्यानंतर उदयनराजेंना राज्यसभेवर घेण्याचा शब्द भाजपाने दिल्याची चर्चा आहे. यावर संजय काकडे यांनी त्याची भूमिका मांडली आहे. मी भाजपा संघटनेत बांधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नुसती छबी काय कामाची असंही काकडे यांनी विचारलं आहे.

उदयनराजेंची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा असल्याने याबाबतचा प्रश्न संजय काकडे यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी उदयनराजेंवर टीका केली. श्रीनिवास पाटील हे सक्रिय राजकारणापासून गेल्या दहा वर्षांपासून दूर होते, साताऱ्यापासून दूर होते तरीही राजेंचा पराभव झाला ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त ही छबी असल्याने पक्षाला उपयोग होतो असं नाही जनाधार जेवढा दाखवला जातो तेवढा खरोखर उदयनराजेंच्या मागे आहे का? असाही प्रश्न संजय काकडे यांनी विचारला.