ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचा सवाल

भारतात सारे काही आलबेल असल्याचा देखावा केला जातो. मात्र, लोकशाही देशातील अल्पसंख्याक दहशतीखाली का, असा परखड सवाल ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांनी मंगळवारी उपस्थित केला.

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनतर्फे सहगल यांना लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेल्या सहगल यांनी व्हीडीओ संदेशाद्वारे संवाद साधला. सहगल यांच्या वतीने ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, जयवंत मठकर, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सुगावा प्रकाशनचे प्रा. विलास वाघ, डॉ. अभिजित वैद्य, प्रा. गीतांजली वैद्य, डॉ. प्राची रावळ आणि  डॉ. नितीन केतकर या वेळी उपस्थित होते.

सहगल म्हणाल्या, अल्पसंख्याक दहशतीखाली असणे हे कशाचे लक्षण आहे? खोटय़ा आरोपांखाली त्यांना तुरुंगामध्ये डांबले जात असून गुंड मोकाट वावरत आहेत. श्रद्धांबाबत कोणी प्रश्न उपस्थित करणारा आपल्या विरोधातला आहे असे समजून एक तर त्याला सरकारच्या विचारधारेशी जुळवून घेण्यास भाग पाडले जाते. अन्यथा त्यांचा दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश केला जातो. राज्य घटनेतील तत्त्वांची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पदोपदी पायमल्ली होत आहे. शाळा, महाविद्यालय स्तरांपासून बुद्धिभ्रम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. साहित्य, संगीतासह सर्वच कला सरकारच्या रडारवर आल्या आहेत.

नगरकर म्हणाले, इतिहासातील आपल्याला हवी ती मोजकी व्यक्तिमत्त्वे वगळता बाकी इतिहास खोडून टाकण्याचे काम केले जात आहे. मोठमोठे पुतळे उभारून भारत घडणार नाही. ज्यांचे पुतळे उभे केले जात आहेत त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे.

हा हिंदू दहशतवाद नाही का?

देशामध्ये हजारो वर्षांत हिंदूंनी दहशतवाद केल्याचे एकही उदाहरण नाही, असे सांगत ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग केल्याचा ठपका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वध्र्यातील सभेमध्ये काँग्रेसवर ठेवला, याकडे बाबा आढाव यांनी लक्ष वेधले. हिंदूची बदनामी सहन केली जाणार नाही, असे पंतप्रधानांचे वक्तव्य हा हिंदू दहशतवाद नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.