कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ांवरील महापुराच्या संकटाने किल्लारी भूकंपाची आठवण येते. यातून सावरण्यासाठी चार ते सहा वर्षे लागतील.  या संकटाच्या पाश्र्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या तर काय बिघडणार आहे, असा परखड सवाल ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी रविवारी उपस्थित केला.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे रविवारी ‘नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार’ महानोर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, साहित्यिक राजन खान, नाटय़ परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांना नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्याने सन्मानित करण्यात आले.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. संजय चोरडिया आणि सचिन इटकर या वेळी उपस्थित होते.

महानोर म्हणाले,की १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्र निवडणुकांच्या काळात मी आठवीतील विद्यार्थी होतो. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भाषणे ऐकली आणि शाहीर अमर शेख यांनी सादर केलेली नारायण सुर्वे यांची कविता ऐकली. तो सुर्वे यांच्याशी माझा पहिला परिचय होता.  नेहरूंशी त्यांचे मतभेद होते, मात्र नेहरू गेले तेव्हा अत्यंत हृद्य कविता सुर्वे यांनी नेहरूंवर लिहिली. समाजाचे दुख आणि विद्रूपीकरण यांवर बोलते ती खरी कविता, हा धडा मला सुर्वे यांनी दिला. त्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा मोठा आनंद आहे.