राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांची तयारी सुरू असून मित्रपक्ष काँग्रेससोबत राष्ट्रवादीला निवडणुका लढवायच्या आहेत. मात्र, त्यांनी काय आहे ते सरळ सांगावं रडीचा डाव आम्हाला पसंत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी काँग्रेसला सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या जागा आम्हीच लढवणार आहोत. याला दुसरा पर्याय नाही असे सांगत त्यांनी काँग्रेस चांगलेच कोंडीत पकडले.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार बोलत होते. या बैठकीला मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, प्रफुल्ल पटेल, विजयसिंह मोहिते पाटील, डी. पी. त्रिपाठी, गणेश नाईक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्यात होणाऱ्या तीन पोटनिवडणुकांबाबत मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने रिक्त झालेल्या सांगलीच्या जागेचा विचार करावा लागाणार आहे. तसेच लातूर, उस्मानाबाद, बीडची जागा आमची होती, ती देखील आमचीच असेल असे त्यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, माझा आनंदाचा काळ हा विरोधात असतानाचा आहे. विरोधात असताना नागरिकांमध्ये जाता येते, त्यांचे प्रश्न समजून घेता येतात. आगामी निवडणुका लक्षात घेता प्रत्येकाने पक्ष वाढीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, येत्या काळात पक्षाचे काम चांद्यापासून बांद्यापर्यँत घेऊन जाणार आहोत. पक्ष संघटन वाढीसाठी बूथ कमिटीवर भर देणार असून हे काम करताना वाईटपणा देखील घेण्यास तयार आहे.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रोत्साहित करताना अजित पवार म्हणाले, तुम्ही उत्तम बॅट्समनही आहात त्यामुळे रोहित शर्मा सारखी बॅटिंग करा, आगामी निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून द्या. जयंत पाटील यांची ख्याती फिरकी गोलंदाज म्हणूनही आहे ते मध्येच गुगली टाकतात, अशा शब्दांत अजित पवार यांनी पाटील यांच्या कामाचे वैशिष्ट्य सांगितले.