पावणेतीन वर्षांचा आदिवासी मुलगा नारायणगावजवळून बेपत्ता झाला. गरीब आई-वडिलांनी प्रयत्न करूनही तो सापडत नव्हता. ही मंडळी एका शेतकऱ्याकडे शेतीच्या कामासाठी पोहोचली, तिथे एक योगायोग त्यांची वाट पाहात होता. कारण त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर व्हॉट्स अ‍ॅपद्वारे एका मुलाचा फोटो आला होता. तो त्याच हरवलेल्या आदिवासी मुलाचा होता. त्याच्या आजीने हा फोटो पाहिला आणि मग सर्व प्रकारची प्रक्रिया पार केल्यानंतर अखेर तो मुलगा आई-वडिलांच्या कुशीत विसावला.. त्याला कारणीभूत ठरले शेतकऱ्याकडील व्हॉट्स अ‍ॅपची सुविधा आणि जबरदस्त योगायोग!
मंगेश आणि निर्मला काळे यांचा हा मुलगा. तो गेल्या महिन्यात नारायणगाव स्टँडवरून बेपत्ता झाला. तो आई-वडिलांसोबत तिथे गेलेला असताना तो हरवला. तो नेमका कसा बेपत्ता झाला याबाबत पोलिसांनाही माहिती मिळालेली नाही. पोलिसांना तो पारगाव येथे सापडला. त्याला नीट बोलता येत नाही. त्यामुळे त्याच्या पालकांना शोधणे कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला निराधार बालकांसाठी असलेल्या आकुर्डी येथील ‘आधार’ या संस्थेत दाखल केले. दरम्यानच्या काळात नारायणगावजवळील पारगाव येथील बडेकर वस्तीवरील शेतकरी ज्ञानेश्वर लक्ष्मण बडेकर यांच्या शेतात टोमॅटोची लागवड करायची होती. त्यासाठी त्यांना मजूर हवे होते. त्यांना १ मे रोजी नारायणगाव स्टँडवर मंगेश काळे आणि त्यांचा एक मित्र भेटले. त्यांनी बडेकर यांच्या शेतात काम करण्याचे कबूल केले. त्यांनी काम केले. नंतर मंगेश आणि त्यांचे मित्र काही कामासाठी म्हणून जास्तीचे पैसे घेऊन गेले. ते काही दिवस आलेच नाहीत. मंगेश काळे यांची आई बडेकर यांच्याकडेच होती. बडेकर यांनी तिच्याकडे चौकशी केली असता हे लोक मुलाला शोधण्यासाठी गेले असल्याचे तिने सांगितले. तेव्हा बडेकर यांना पहिल्यांदाच समजले की, मंगेश काळे यांचा मुलगा हरवला आहे.
बडेकर यांच्याकडे व्हॉट्स अ‍ॅपवर काही दिवसांपूर्वी एक मुलगा सापडल्याची पोस्ट आली होती. त्यांनी तो फोटो मंगेश काळे यांच्या आईला दाखवल्यावर तो मुलगा मंगेश यांचाच असल्याचे तिने सांगितले. मग बडेकर यांनी नारायणगाव पोलीस ठाणे, तेथून महिला व बालकल्याण विभाग, आधार केंद्र अशा ठिकाणी पाठपुरावा केला. ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवली. त्यासाठी टोमॅटोची लागवड सुरू असतानाही ते काही दिवस मंगेश काळे यांना घेऊन फिरत होते. आधार केंद्रात त्यांनी मुलाला आणि मुलाने आई-वडिलांना, त्याच्या भावाला ओळखले. अखेर सर्व औपचारिकता आणि कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर हा मुलगा आई-वडिलांच्या कुशीत विसावला.
मंगेश भेटला नसता तर?
मंगेश काळे यांना त्यांचा मुलगा शोधून द्यायला मदत करणारे ज्ञानेश्वर बडेकर यांनी सांगितले, ‘‘मला टोमॅटोचे शेत बांधायचे होते. त्यासाठी मजुरांच्या शोधात असताना मंगेश भेटला आणि त्याचा मुलगा हरवला असल्याच उलगडा झाला. त्याने शेतातले काम पूर्ण होईपर्यंत मुलगा हरवल्याबाबत काही सांगितलेच नाही. तो मला योगायोगानेच भेटला. त्याचे राहणीमान आणि कमी बोलण्याचा पिंड पाहता त्याला मुलगा सापडला असता का, हा प्रश्नच आहे. पण हरवलेल्या मुलाला त्याच्या आईवडिलांकडे पोहोचवण्यास मी कारणीभूत ठरलो याचा आनंद आहे.’’