दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटना आपण व्हॉट्स अॅप स्टेटसला ठेवतो. पण यामुळे पुण्यात चक्क एका व्यापाऱ्याला चार कोटींचा फटका बसला आहे. ही घटना सहा नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास मौजे दौंड गावच्या हद्दीत घडली होती. अप्पा श्रीराम कदम (रा. कौठळी, ता. आटपाडी, सांगली) यांनी पुणे ग्रामीण पोलिसांत याबाबत तक्रार दिली होती.

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी जिथे जाईल तिथे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अपडेट ठेवत होता. चोरट्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. ज्या गावात व्यापारी सोने खरेदीला गेल्याची माहितीदेखील त्यांच्या स्टेटसवरूनच चोरट्यांना समजली. सहा नोव्हेंबर रोजी दौंड रेल्वे स्थानकाबाहेर चोरांनी पाळत ठेवून व्यापाऱ्याला चार कोटींना लुबाडलं. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

दौंड रेल्वे स्थानकाच्या तिकीट घरासमोर दोन जणांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने गाडीत बसवून त्यांच्याकडून सोन्याचे बिस्कीट व रोख रक्कम पळविणाऱ्या चार जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ७० लाख ७१ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.