25 September 2020

News Flash

क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेण्यासाठी व्हॉटसअ‍ॅप ग्रुप..

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीत कारवाई करुन सट्टेबाजांसह सहा जणांना अटक केली

व्हॉट्सअ‍ॅप

पिंपरीत गुन्हे शाखेकडून सट्टेबाजांसह सहा जणांना अटक
इंडियन प्रीमिअर लिग ( आयपीएल) क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना प्रत्येक सामन्यावर देशभरात सट्टेबाजांकडून मोठय़ा प्रमाणावर सट्टा घेतला जात आहे. त्यासाठी पिंपरीतील सट्टेबाजांनी चक्क व्हॉटसअ‍ॅप ग्रुप सुरु करुन त्यामाध्यमातून सट्टा घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीत कारवाई करुन सट्टेबाजांसह सहा जणांना अटक केली असून या कारवाईत एक लाख ६७ हजार ८०० रुपयांची रोकड, मोबाईल असा दोन लाख नऊ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सट्टा घेणारे (बुकी )अमोल बबन पाटोळे (वय २४, रा. साई हाऊसिंग सोसायटी, गुरुद्वाराजवळ, आकुर्डी), त्याचा साथीदार सुनील उर्फ बंटी नारायण रोहरा (वय ३६, रा. पिंपरी गांव ), आशिष भास्कर मोरे (वय २९, रा. पद्मा निवास, अशोक चित्रपटागृहाजवळ, पिंपरी), सुरेश राम इसराणी (वय २५, रा. रवीकिरण सोसायटी, पिंपरी), मोहित पारस कोडवानी (वय २१, रा. शनी मंदिराजवळ, पिंपरी), विक्की मुलू इसराणी (वय २१, पिंपरी बाजार ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आयपीएल स्पर्धेतील गुजरात लायन्स विरुद्ध सनराईजर्स हैद्राबाद या सामन्यावर शुक्रवारी ( २७ मे) पिंपरीत मोठय़ा प्रमाणावर सट्टा (बेटींग) घेतला जात असल्याची माहिती पोलीस हवालदार राजाराम काकडे यांना मिळाली. त्याआधारे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील साई चौक येथे मोबाईलवरुन सट्टा घेणारा बुकी अमोल पाटोळे याला सापळा रचून पकडण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
पाटोळे याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारा रोहरा आणि सट्टा खेळणारे मोरे, इसराणी, कोडवानी यांना पकडण्यात आले. या कारवाईत त्यांच्याकडून सात मोबाईल, रोकड असा दोन लाख नऊ हजार आठशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, अन्सार शेख, राजाराम काकडे, अमित गायकवाड, संतोष बर्गे, शशिकांत शिंदे, संजय गवारे, जयवंत जगताप, राजेंद्र शेटे, राजू मचे, अर्जुन भांबुरे, गणेश काळे, प्रमोद वेताळ, हेमंत खरात यांनी ही कारवाई केली.

ग्रुपमध्ये एकशे चाळीस सट्टेबाज
पिंपरी परिसरातील बुकी अमोल पाटोळे आणि सुनील रोहरा यांनी आयपीएल सामन्यांवर सट्टा घेण्यासाठी व्हॉटसअ‍ॅप ग्रुप सुरु केला होता. या ग्रुपमध्ये एकशे चाळीस सट्टेबाजांना सामील करुन घेण्यात आले होते. प्रत्येक सामन्याला ग्रुपचे नाव बदलायचे. या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी सुरुवातीला पाचशे ते एक हजार रुपये घेण्यात आले होते. प्राथमिक तपासात सट्टा खेळणाऱ्यांकडून गोळा केली जाणारी रक्कम पाटोळे आणि रोहरा हे कात्रज परिसरातील एका बडय़ा बुकीला देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 2:04 am

Web Title: whatsapp group form for taking ipl cricket matches betting
Next Stories
1 खारीचा वाटा, पण आयुष्यं उभी करणारा..
2 दुष्काळग्रस्त भागाकडे पुणेकरांच्या दातृत्वाचा ओघ
3 बारावीच्या परीक्षेत बदल करायचे का ते तज्ज्ञांनी ठरवावे – विनोद तावडे
Just Now!
X