पुण्यात रात्रीच्या वेळी वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीचा आलेला अनुभव मांडणारा ऑडिओ सध्या व्हॉट्स अॅपवर मोठय़ा प्रमाणात फिरत आहे. त्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबावर ओढवलेला प्रसंग आणि त्यातून त्या कुटुंबाची सुखरूप झालेली सुटका याचे वर्णन करण्यात आले आहे. या ऑडिओमधून पुण्यात कमी वर्दळीच्या रस्त्यांवर वाहन चालवणे किती धोकादायक बनले आहे, याची कल्पना येते आणि आपल्या बाबतीत असे घडले तर?.. या विचाराने अंगावर काटासुद्धा येतो.
‘हाय, मी शीतल बोलतीए ..’ या वाक्याने हा ऑडिओ सुरू होतो. त्यात शीतल घडलेल्या प्रसंगाची सविस्तर माहिती देते. शीतल, तिचा पती रघू आणि मुलगी ओवी हे तिघे होंडा सिटी मोटारीने जात होते. वेळ रात्री अकराची, ठिकाण औंध रस्ता. ते वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी निघाले होते. औंध रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्यांच्या मोटारीच्या पाठीमागून एक मोटारसायकल आली. त्यावर दोन तरुण होते. दारू प्यायलेले. त्यांनी आमची मोटार थांबवली. ते म्हणाले, तुमच्यामुळे आमचा एक माणूस पडला आहे. असे काही झाले नव्हते. तसे सांगितल्यावर ते आरडाओरडा करू लागले. तेवढय़ात बाजूने आणखी एक कुटुंब मोटारीतून आले. हे लोक आम्हाला त्रास देत आहेत, हे समजल्याने ते थांबले. मोटारसायकलवरील तरुणांचा असा समज झाला होता की, गाडीत रघू एकटाच आहे. मात्र, शीतल आणि ओवी मागे बसले असल्याचे समजल्यावर त्यांनी ‘तुम्ही सोबत आहात म्हणून सोडून देतो’ अशी भाषा केली.
हे निघणार तेवढय़ात आणखी चौघे आले, त्यांनी रघूला मारहाण करण्याचा आणि मोटारीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात बाजूच्या मोटारीतील कुटुंबाने जाऊ द्या फॅमिली आहे, असे म्हणत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. रघूनेसुद्धा प्रसंगावधान दाखवून मोटार बाजूला घेत असल्याचे सांगितले आणि लगेचच तेथून वेगाने मोटार पुढे नेली. त्यामुळे या टोळक्याच्या तावडीतून या कुटुंबाची सुटका झाली.. हा प्रसंग इतर कोणावर ओढावू नये आणि लोकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना काळजी घ्यावी, या उद्देशाने शीतल हिने हा ऑडिओ व्हॉट्स अॅपवर टाकला. तो आता अनेक ग्रुपमध्ये फिरत आहे. तो चर्चेचा विषयही बनला आहे. त्यावर पडत असलेल्या कॉमेन्ट्सवरून पुण्याच्या सुरक्षिततेबाबत नागरिक साशंक असल्याचे जाणवते. ‘पुणे पूर्वीचे राहिलेले नाही, आता प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी,’ अशा सूचनाही अनेक नागरिकांनी केल्या आहेत.
पुण्यात लुटण्याच्या अनेक घटना
पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांना आणि वाहनचालकांना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे रात्री कमी वर्दळीच्या भागातून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनांचा पोलीस तपास करत आहेत, अशा टोळ्यांचाही शोध घेत आहेत. मात्र, नागरिकांनीही काही काळजी घेणे आवश्यक आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.