कन्नन गोपीनाथन यांचे आवाहन

पुणे : सरकारच्या कोणत्याही निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना ‘तुकडे तुकडे गँग’ किंवा जिहादी, अर्बन नक्षल, देशद्रोही म्हणून संबोधले जाते. मात्र, जेव्हा नागरिक प्रश्न विचारायचे थांबतात, तेव्हा लोकशाही हुकूमशाहीत बदलण्याची भीती असते. त्यामुळे निर्भय होऊन प्रश्न विचारा, अन्यथा किंमत चुकवावी लागेल, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी सोमवारी केले.

लोकशाही उत्सव समिती आणि हम भारत के लोग यांच्यातर्फे सोमवारी ‘एनआरसी, सीएए, एनपीआरला विरोध का?’ या विषयावर गोपीनाथन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

मानवाधिकार कार्यकर्त्यां आणि पत्रकार तिस्ता सेटलवाड या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

गोपीनाथन म्हणाले, नागरिकत्व देण्यासाठी पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या तीनच देशांची निवड का केली हा मूलभूत प्रश्न आहे. ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत, ते घुसखोर ठरतील. मात्र, आपल्याच देशातील गरीब, आदिवासी, भटके अल्पसंख्याक अशा अनेकांकडे कागदपत्रे नाहीत. त्यांची कागदपत्र तयार करून घेणे हे सरकारचे काम आहे. मात्र, सरकार ते करत नाही हे गंभीर आहे. देशातील लोकांचे विभाजन करून देश शक्तिशाली करणे मूर्खपणाचे आहे. सरकारच्या हुकूमशाहीचे नव्हे तर मूर्खपणाचे भय वाटते.

तिस्ता सेटलवाड म्हणाल्या, गुंडगिरी आणि दहशतीसाठी वापरले जाणारे रस्ते आता नागरिकांच्या शांततापूर्ण आंदोलनांसाठी वापरले जात आहेत ही सकारात्मक गोष्ट आहे. वृत्तमाध्यमांकडून केली जाणारी सर्वेक्षणे ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. भीती ही गोष्ट हत्यारासारखी वापरणे आणि जनतेच्या मालमत्ता कवडीमोलाने ‘कॉर्पोरेट्स’च्या ताब्यात देणे अशी फॅसिस्ट नीती या सरकारकडून अवलंबण्यात येत आहे. मात्र, आपल्या देशाची तुलना अमेरिका, युरोपसारख्या प्रगत देशांशी न करता धार्मिक राष्ट्रवादी देशांशीच का केली जाते हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जाणे आवश्यक आहे.