मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसेच्या पाठिंब्यावर उभे असलेले शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवड येथे रविवारी सभा होत आहे. सत्ता दिली तर अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांना तुरुंगात पाठवतो, अशी घोषणा ठाकरे यांनी नुकतीच पुण्यातील सभेत केली, त्यामुळे बेकायदेशीर बांधकामांना पाठिंबा देणाऱ्या जगताप यांच्या प्रचारसभेत ठाकरे काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा गाजत आहे. या बांधकामांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयानेही आदेश दिले आहेत. या स्थितीत जगताप यांच्यासह इतर आमदारांनी बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठीच जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वबळावर उमेदवारी जाहीर केली. राज ठाकरे यांनी अशाच बेकायदेशीर बांधकामांबाबत मुद्दय़ावर कोंढवा येथे जाहीर सभेत टीका केली. आपली सत्ता आली तर अशी बांधकामे करणाऱ्या बिल्डरांना तुरुंगात पाठवू, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता जगताप यांच्या सभेत ते काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे.
चिंचवडजवळ वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनसमोरील मैदानात सायंकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. त्यासाठी प्रख्यात संगीतकार अजय-अतुल या वेळी उपस्थित राहणार आहेत. ठाकरे यांची २००७ च्या महापालिका निवडणुकांच्या वेळी पिंपरी चौकात जाहीर सभा झाली होती. त्यानंतर महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत त्यांनी एकही सभा घेतली नव्हती. त्यानंतर ते प्रथमच प्रचार सभेसाठी शहरात येत आहेत. अनधिकृत बांधकामांबरोबरच खासदार गजानन बाबर व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेला दिलेली सोडचिठ्ठी, जगतापांनी नाकारलेली राष्ट्रवादीची उमेदवारी, अजितदादा कारभारी असलेल्या पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचार आदी विषयांवर ते काय बोलणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.