23 April 2019

News Flash

शहरबात : नद्यांची झाली गटारे जबाबदार कोण?

नद्यांचे प्रदूषण हे पिंपरी-चिंचवडचे जुने दुखणे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना, इंद्रायणी या नद्या मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांचे आरोग्य पूर्णपणे बिघडले असून त्यास नेमके कोणते घटक जबाबदार आहेत, हे जगजाहीर आहे. मात्र, तरीही या महत्त्वपूर्ण विषयाकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जाते. केवळ कागदी घोडे नाचवले जात असून ठोस उपाययोजना होतच नाही.

भोसरीचे आमदार महेश लांडगे व महापौर राहुल जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत नद्यांच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले. नद्यांचे प्रदूषण हे पिंपरी-चिंचवडचे जुने दुखणे आहे. अनेक वर्षांपासून हा विषय केवळ चघळला जात असून त्यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे कोणीही मनावर घेतलेले नाही. नदीप्रदूषणासंदर्भात केवळ कागदी घोडे नाचवून कोटय़वधी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. हा खर्च व्यर्थ झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. नदीसुधार प्रकल्पांमुळे नदीची अवस्था सुधारली नाही. मात्र सत्ताधारी नेते,अधिकारी व ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती चांगलीच वधारल्याचे दिसून येते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमासाठी आळंदीत आले होते. तेव्हा इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचे पाप पिंपरी पालिकेचे आहे,अशी थेट टीका त्यांनी केली होती. तेव्हा महापालिकेतील बहुतांश पदाधिकारी तेथे हजर होते. तीर्थक्षेत्र असणाऱ्या आळंदीतील नदीपात्रात पिंपरी-चिंचवड शहरातील सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते, ही आळंदीकरांची जुनी तक्रार आहे. त्यावरून अनेकदा आळंदीकरांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ताशेरे ओढल्यानंतरही  सत्ताधारी नेत्यांनी काहीही बोध घेतला नाही. कारण, आजही आळंदीतील परिस्थिती बदललेली दिसत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये तर नदीपात्रात थेट सांडपाणी सोडले जाते. जागोजागी गाळ साचलेला आहे. जलपर्णीने नदीचे पात्र भरून जाते, हे नेहमीचे चित्र आहे.

अनेक कंपन्या त्यांचे सांडपाणी रात्रीच्या अंधारात नदीपात्रात सोडतात. नदीपात्रालगतच्या परिसरात अतिक्रमणे आहेत. यांसारख्या अनेक गोष्टी जगजाहीर असताना त्यासंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही. या पाश्र्वभूमीवर, आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत सूचनांचा पाऊस पाडण्यात आला. नदीप्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा, नदीला जोडणारे उद्योगधंद्यांचे, तसेच ड्रेनेज नाले शोधण्याचे सर्वेक्षण त्वरित पूर्ण करावे, औद्योगिक पट्टय़ातील रसायनमिश्रित पाणी नद्यांमध्ये सोडणाऱ्या कंपन्यांची गंभीर दखल घ्यावी, पाण्याचे नियोजन वेळेत करावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी तपासणी मोहीम घ्यावी, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. नदीपात्रात साचलेला गाळ काढून टाकावा, नदीत मिसळणारे सांडपाणी रोखावे.

नदीच्या कडेने वृक्षारोपण करावे, बंधाऱ्यांचे मजबुतीकरण करावे. नदीकाठी स्वच्छतागृह, स्मशानभूमी व धोबीघाट विकसित करावे, मनोरंजनाची केंद्र उभारावीत, यासारख्या अनेक सूचना बैठकीत करण्यात आल्या. नुसत्याच चर्चा आणि बैठका होतात. नियोजनाचे घोडे कागदावरच धावतात. प्रत्यक्षात उपाययोजना होत नाही. चर्चेचे हे गुऱ्हाळ असेच राहील, अशी शक्यता नाकारता येणार नाही. पुन्हा काही दिवसांनी बैठक होईल आणि नद्यांची गटारे होण्यास जबाबदार कोण, असा मुद्दा पुन्हा नव्याने मांडला जाईल, तेव्हा आश्चर्य वाटायला नको.

आळंदीकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

इंद्रायणीच्या दूषित पाण्यामुळे त्रस्त असणारे आळंदीकर नागरिक आळंदीसाठी महत्त्वपूर्ण असणारी भामा आसखेड ते आळंदी ही बंदनळ पाणीपुरवठा रखडल्याने आणखी वैतागले आहेत. ही पाणी योजना तातडीने मार्गी लावावी, या मागणीसाठी आळंदीकरांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नुकतेच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेवक मीरा पाचुंदे, स्मिता रायकर, सुनीता रंधवे, अशोक उमरगेकर, संतोष गावडे, ज्ञानेश्वर रायकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. आळंदीतील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली  असल्याने ही योजना तातडीने मार्गी लावावी याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याने तूर्त आळंदीकरांना दिलासा मिळाला आहे.

कृष्णराव भेगडे यांचा सत्कार

कृष्णराव भेगडे हे मावळातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व. त्यांच्या नुकत्याच झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी समस्त मावळातील दिग्गज मंडळी आवर्जून हजर होती. माजी  खासदार विदुरा नवले यांच्या हस्ते भेगडे यांचा सत्कार झाला. माजी मंत्री मदन बाफना, आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, बापू भेगडे, माउली दाभाडे, केशवराव वाडेकर या वेळी उपस्थित होते. सध्याच्या राजकारणाला विकृत स्वरूप आले असून राजकारण म्हणजे एकप्रकारची शिवी वाटू लागली आहे, अशी खंत कृष्णराव भेगडे यांनी व्यक्त केली.

First Published on August 22, 2018 1:04 am

Web Title: who is responsible for the drainage of rivers