संत तुकारामांचा जादूटोण्याला तीव्र विरोध होता. जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करणारे वारकरी हे खरे वारकरी नाहीतच, अथवा त्यांची दिशाभूल केली जात आहे, असे स्पष्ट मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
भांडारकर ओरिएंटल रीसर्च इन्स्टिटय़ूटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉ. वसंतराव विनायक ढेकणे स्मृती व्याख्यानमाले’त डॉ. मोरे यांचे ‘संत तुकारामांची सामाजिक दृष्टी’ या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तरातील एका प्रश्नावर त्यांनी वरील मत व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांनी  अध्यक्षपदी होते.
 जादूटोणाविरोधी विधेयकाला येत्या पावसाळी अधिवेशनात शासनाकडून मान्यता देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे सध्या हे विधेयक चर्चेत आहे. वारकऱ्यांच्या काही संघटनांकडून या विधेयकाला जोरदार विरोध करण्यात येत आहे. याबाबतच्या प्रश्नावर मोरे म्हणाले, वारकऱ्यांची दिशाभूल होते आहे. काही राजकीय पक्ष व छुप्या हिंदुत्ववादी संघटना जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करण्याचा आपला हेतू साध्य करण्यासाठी वारकऱ्यांचा वापर करून घेत आहेत.
व्याख्यानात ते म्हणाले, घट्ट औपचारिक परंपरा न मोडता त्यांना वळसा घालण्याची पद्धत संत तुकारामांनी त्यांच्या धर्मरक्षणाच्या कार्यात वापरली. वेदांपासून वंचित राहिलेल्या सामान्य माणसांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांचे सक्षमीकरण करण्याचे हे काम होते. विठ्ठलाच्या भक्तीसाठी वारी करणाऱ्या लोकांचा पंथ म्हणून वारकरी संप्रदाय संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनच अस्तित्वात होता. त्याला सांप्रदायिक प्रतिष्ठा ज्ञानेश्वरांनी मिळवून दिली. विठ्ठल हे जसे कृष्णाचे मराठमोळे रूप असल्याची श्रद्धा होती, तसेच ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचे मराठमोळे रूप समजले जात होते. संत तुकाराम याच धर्मसंप्रदायाचे घटक होते. त्या काळी समाजाचा पायाच धर्म होता.
‘समाजसुधारणा म्हणजे धर्मसुधारणा’ या संकल्पनेला वारकरी संतही अपवाद नव्हते. समाजातील धर्मगुरू त्यांचे धर्म सांगण्याचे काम व्यवस्थित करत नसतील, तर ते दुसऱ्या कुणाला तरी हाती घ्यावे लागते. तेच तुकोबांनी केले. संत तुकारामांना सामाजिकदृष्टय़ा वेदांचा अधिकार नव्हता. त्यामुळे त्यांनी सांगितलेला धर्म हा वेदांना ‘बायपास’ करण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न त्यांनी भगवद्गीतेच्या साहाय्याने केला. संत हा जगाचे आघात सोसणारा, लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा असावा, अशी संतांची समाजाभिमुख व्याख्या तुकारामांना अभिप्रेत होती.