सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. एकूणच मतदान टक्केवारीचा विचार करून लोक मतदान का करत नाहीत, या कारणांचा अभ्यास सध्या केला जात आहे. अशा प्रकारचा अभ्यास व्हावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या गेल्या तीन निवडणुकांचा विचार करता मतदानाची सरासरी टक्केवारी ५४.५ एवढी राहिली. ती विचारात घेऊन मतदान टक्केवारी आणि लोकांची मानसिकता या विषयावरील सर्वेक्षण २२ ते ३० डिसेंबर दरम्यान पुण्यात करण्यात आले. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेने सिम्बायोसिस कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या साहाय्याने हे काम केले.

मतदार याद्यांमध्ये सुधारणा केल्यास तसेच मतदारांची नावे आणि यादीतील काही भाग वगळण्याचे जे प्रकार होतात ती त्रुटी दूर केल्यास आणि राजकीय पक्षांनी स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दिल्यास आगामी महापालिका निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढू शकते, असे निष्कर्ष एका सर्वेक्षणातून आले आहेत. सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि सधन गटातील मतदार मतदान प्रक्रियेबाबत उदासीन असल्याची वस्तुस्थितीही या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

Blood collection, donation, campaign, lok sabha election 2024, code of conduct
रक्त संकलनाला निवडणूक आचारसंहितेचा फटका
akola lok sabha marathi news, akola lok sabha latest news in marathi
अकोला : उमेदवारांपुढे सर्वांना एकसंघ ठेवण्याचे आव्हान! महायुती व आघाडीच्या धर्माचे पालन…
Lok Sabha Elections 2024 Aggressive campaigning of candidates on social media
लोकसभा निवडणूक : उमेदवारांचा समाज माध्यमावर आक्रमक प्रचार
In the excitement of elections the prices of agricultural commodities including soybeans and gram have fallen
निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांना हमीभाव मिळेना, कमी दराने…

गेल्या (सन २०१२) महापालिका निवडणुकीत ४५ टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेले एनआयबीएम, विमाननगर, बालेवाडी आणि कोथरूड हे चार वॉर्ड आणि ६५ टक्क्यांवर मतदान झालेले हडपसर व अलका चित्रपटगृह हे दोन असे सहा वॉर्ड सर्वेक्षणासाठी निवडण्यात आले होते. त्यातील १,८०० मतदारांच्या घरी जाऊन विविध प्रश्नांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणातून निघालेल्या निष्कर्षांची माहिती संस्थेचे प्रभारी संचालक राजस परचुरे, सर्वेक्षण प्रकल्पाच्या समन्वयक मानसी फडके आणि ‘यशदा’चे प्रा. ज्ञानेश्वर तळुले यांनी दिली. फडके यांनी सांगितले, की गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केले नाही अशांनी या सर्वेक्षणात जी कारणे सांगितली, त्यात माझे नाव मतदार यादीत नव्हते, असे कारण सांगणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्के असून यादीत नाव नसल्यामुळे मतदार चिठ्ठी (व्होटर स्लीप) घरी आली नाही असे कारण २० टक्के मतदारांनी दिले आहे. मतदानाच्या दिवशी पुण्यात नव्हतो असे कारण २२ टक्के मतदारांनी दिले आहे. माझ्या मताने काही फरक पडेल असे मला वाटत नाही, असे सांगणाऱ्यांची संख्या २३ टक्के तर माझ्या मताने काही होणार नाही, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण २० टक्के इतके आहे.

स्थानिक राजकारणामध्ये मतदारांना फारसा रस नसल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे. स्थानिक राजकीय कार्यक्रमात काही ना काही स्वरूपात भाग असतो का किंवा यापुढे भाग घ्याल का, या मुद्दय़ाबाबत दहापैकी केवळ चारच गुण मिळाले आहेत. मतदारांचा आणि महापालिकेचा तसेच स्थानिक नगरसेवकाचा गेल्या पाच वर्षांत किती संपर्क आला याचीही पाहणी करण्यात आली असून हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचेही दिसून आले आहे.

राजकीय पक्षांनी स्वच्छ प्रतिमेचे, गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसलेले, नागरिकांनी सहजतेने उपलब्ध होऊ शकतील असे उमेदवार दिल्यास निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी वाढू शकते, असाही निष्कर्ष आहे. मतदानाची वेळ रात्री नऊपर्यंत वाढवल्यास तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानाची आठवण करणारा एसएमएस आल्यास मतदानाचे प्रमाण वाढू शकते, अशीही सूचना मतदारांनी केली आहे. संस्थेतर्फे मतदान वाढवण्यासंबंधीचे उपक्रम तसेच निरीक्षण अहवाल आयोगाला सादर केला जाणार असल्याचे  ते म्हणाले.