‘‘आपल्याला इतिहासाचा आणि संस्कृतीचा सक्षम पाया आहे. रमाबाई रानडे आणि न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्यासारख्या अनेकांनी आपला सामाजिक पाया भक्कम केला असतानाही आजची पिढी इतक्या भांबावलेली का आहे असा प्रश्न पडतो,’’ असे मत अभिनेत्री स्पृहा जोशी हिने शनिवारी व्यक्त केले.
रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या ‘सेवासदन डीएड महाविद्यालयाच्या शताब्दीवर्ष समारंभाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये स्पृहा बोलत होती. रमाबाई रानडे यांनी १९१४ साली महिलांसाठी सेवासदन डीएड महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये अभिनेता विक्रम गायकवाड, रमाबाई रानडे यांची पणती वसुधा आपटे, संस्थेची माजी विद्यार्थिनी, नायब तहसीलदार सुरेखा ढोले, संस्थेच्या अध्यक्ष शशी किर्लोस्कर, प्राचार्य डॉ. स्वाती गाडगीळ आदी उपस्थित होते.
या वेळी आपटे म्हणाल्या, ‘‘रमाबाईंनी न्यायमूर्ती रानडे गेल्यानंतरही २३ वर्षे समाजकार्य केले. स्त्रियांना स्वतंत्र आणि सक्षम आयुष्य मिळवून देण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाबरोबरच सर्वागीण प्रगती होण्यासाठी रमाबाईंनी खूप मोठे काम केले आहे. रमाबाईंनी कठीण प्रसंगांना तोंड देऊनही केलेल्या प्रयत्नांमुळेच आजही त्यांचे काम अविरतपणे सुरू आहे. हे सर्व रमाबाईंनी केले, कारण दुसऱ्याचे दु:ख समाजण्याची क्षमता त्यांच्याकडे होती.’’ ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या चित्रीकरणाच्या गमती गायकवाड यांनी या वेळी सांगितल्या.