शहरात रोज १,५०० टन कचरा गोळा होतो आणि २,१०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता महापालिकेने विविध प्रकल्पांमध्ये निर्माण केली आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्यापेक्षा कचरा प्रक्रियेची क्षमता ६०० टनांनी जास्त असतानाही मग कचरा प्रक्रियेसाठी नव्या परदेशी कंपनीला का आमंत्रित केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उरुळीत हंजर प्रकल्पात लागलेल्या आगीनंतर ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन शनिवारी मागे घेण्यात आले. उरुळीतील आंदोलनानंतर शहरात कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि पाठोपाठ राजकीय पक्षांची आंदोलनेही झाली. त्या पाठोपाठ कचऱ्याचा प्रश्न तसेच कचरा वर्गीकरण वगैरेची चर्चा शहरात झाली.
ही आंदोलने सुरू असतानाच एका परदेशी कंपनीला पुण्यात आणण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत. त्यासाठी निविदा काढणे वगैरे दर्शनी सोपस्कारही लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महापालिकेने कचरा प्रकल्पांबाबत माहिती अधिकारात जी माहिती दिली आहे ती पाहिल्यानंतर कचऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याचे कारण काय आणि नव्या कंपनीला आणण्याचा घाट कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो.
शहरात रोज किती कचरा गोळा होतो तसेच महापालिकेच्या प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता किती आहे आदी माहिती युनिक व्हिजन फाउंडेशनचे सरचिटणीस अजय वैशंपायन यांनी माहिती अधिकारात मागितली होती. त्यांना ही माहिती देण्यात आली असून प्रतिदिन २,१०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प महापालिकेने कार्यान्वित केल्याची माहिती महापालिकेनेच लेखी स्वरुपात दिली आहे. तसेच शहरात रोज १,५०० टन कचरा निर्माण होतो, अशी माहितीही महापालिकेने दिली आहे. या माहितीनुसार कचरा निर्मितीपेक्षा प्रक्रियेची क्षमता ६०० टनांनी जास्त असल्याचे स्पष्ट होते. तरीही शहरात कचऱ्याची समस्या सातत्याने उद्भवत आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पांचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करावे अशी मागणी आता वैशंपायन यांनी केली आहे.

प्रक्रिया प्रकल्प कागदोपत्री
महापालिकेतर्फे कचरा प्रक्रिया प्रकल्पांची जी क्षमता सांगितली जात आहे, त्या क्षमतेने हे प्रकल्प चालवले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उरुळीसह शहरातील अनेक कचरा प्रक्रिया प्रकल्प कागदोपत्रीच असल्याचे उघड झाले आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालले, तर कचऱ्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्यामुळे रोज एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या परदेशी कंपनीला आमंत्रण कशासाठी, हा खरा प्रश्न आहे.