फग्र्युसन महाविद्यालयात आयोजन; आंतरराष्ट्रीय चित्रपटकर्त्यांचा सहभाग

पुणे : नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फग्र्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग वन्यजीव (पश्चिम) यांच्यातर्फे गुरुवार (२२ ऑगस्ट) ते रविवार (२५ ऑगस्ट) दरम्यान ‘वाइल्ड इंडिया’ वन्यजीव चित्रपट महोत्सव फग्र्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात चित्रपटांसह प्रदर्शन, चर्चा, मुलाखत आदी कार्यक्रम होणार असून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपटकर्ते नल्ला मुथ्थू, शेकर दत्तात्री, ध्रितीमान मुखर्जी उपस्थित राहणार आहेत.

फग्र्युसनचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांनी ही माहिती दिली. नेचरवॉकचे अनुज खरे, उपवनसंरक्षक रमेश कुमार आदी या वेळी उपस्थित होते. यंदा महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्घाटन वन्यजीव चित्रपटकर्ते शेकर दत्तात्री यांच्या हस्ते गुरुवारी (२२ ऑगस्ट)  सायंकाळी सहा वाजता होईल. वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां लीला पूनावाला उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ चित्रपटकर्ते नल्ला मुत्थू यांच्याशी अभिनेता सुयश टिळक शुक्रवारी (२३ ऑगस्ट) संवाद साधतील. मुलाखतीनंतर नल्ला यांचा ‘क्लॅश ऑफ टायगर्स’ हा नवा चित्रपट दाखवला जाईल. ज्येष्ठ वन्यजीव चित्रपटकर्ते माईक पांडे, संदेश कडूर, विनोद बारटक्के, रिटा बॅनर्जी, किरण घाडगे आदींचे वन्यजीवनविषयक चित्रपट दाखवले जातील. रविवारी (२५ ऑगस्ट) नल्ला मुथ्थू वन्यजीव चित्रपट निर्मिती कार्यशाळाही घेणार आहेत. तसेच जगप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार  ध्रितीमान मुखर्जी यांची मुलाखत होईल. फग्र्युसन महाविद्यालयाच्या परिसरातील वन्यजीवनाविषयी माहिती देण्यासाठी नेचर ट्रेलही आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाला प्रवेश विनामूल्य आहे. अधिक माहिती, नावनोंदणीसाठी ९८२२६३३९३३, ७७२१८५४४६६, ९३२६८२३०५२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

वन्यजीवनाविषयी प्रदर्शन

भारतातील अत्यंत दुर्मीळ खनिजे, जीवाश्म आणि वन्यजीवनाचे प्रतिबिंब असलेली नाणी, तिकिटे याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (२४ ऑगस्ट) ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होईल. त्यानंतर डॉ. गाडगीळ, ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक प्रा. श्री. द. महाजन, डॉ. विलास बर्डेकर यांच्याबरोबर खुली चर्चाही होणार आहे. अशा काही तज्ज्ञ मंडळींबरोबर खुल्या चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.