राजू शेट्टी यांची घोषणा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ४९ जागा लढवणार आहे. ही निवडणूक महाआघाडीतून की स्वबळावर लढवायची याबाबत ऑगस्ट महिन्यात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी केली.

संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले,की आगामी विधानसभेच्या ४९ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागा महाआघाडी की स्वबळावर याचा निर्णय झालेला नाही. मात्र, मी निवडणूक लढवणार नाही.

राज्य सरकारने दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. या बंदीचा फेरविचार झाला पाहिजे. या निर्णयामुळे शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान होणार आहे. केंद्राने कांद्याचे निर्यात प्रोत्साहन अनुदान बंद केल्याने कांद्याचे दर प्रतिक्विंटल ४०० रूपयांनी कोसळले असून केंद्राने निर्यात अनुदान सुरू करावे. राज्याचा कृषी क्षेत्राचा आर्थिक वेग उणे आठ टक्के झाला आहे. शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने विनाअट सरसकट सातबारा कोरा करून शेतीचे वीज बिल माफ करावे, असे ठराव संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आले.

‘सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’

बीडमधील आदेगाव येथील सतीश सुंदरराव सोनवणे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल माउली शुगर इंडस्ट्रीज’ या साखर कारखान्याला ऊस पुरवला होता. सोनवणे यांना उसाचे पैसे न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केली. मात्र, पोलिसांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करणे टाळले आहे. याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावेत आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून सहकारमंत्री देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी या वेळी केली.