पोलीस आयुक्तांचा इशारा, भोसरी परिसरात अचानक भेट
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी भोसरी परिसरात अचानक भेट दिली असता, चिखली-कुदळवाडी येथील भंगार व्यावसायिकांचे गैरकारभार तसेच परिसरातील अवैध धंदे याविषयी त्यांना माहिती देण्यात आली. अवैध धंदे आढळून आल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्तांनी या वेळी दिला.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा पोलीस आयुक्तांपुढे विविध समस्यांचा पाढा वाचण्यात आला. वाहतूक कोंडी, झोपडपट्टय़ांमध्ये दारूची विक्री, वाहनचोरी, घरफोडय़ा, भंगार व्यावसायिकांचे गैरकारभार आदी तक्रारींचा त्यामध्ये समावेश होता. या संदर्भात, योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश शुक्ला यांनी दिले. सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, आमदार महेश लांडगे, नगरसेवक दत्ता साने, नारायण बहिरवाडे, राहुल जाधव, धनंजय आल्हाट, सीमा सावळे, सहायक आयुक्त राम मांडुरके, एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव िशगाडे, दिलीप िशदे आदी उपस्थित होते.
जनता दरबारानंतर चिखली तसेच दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली. दिघी, विश्रांतवाडी येथे जाऊन पालखी मार्गाचीही त्यांनी पाहणी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 3:30 am