दिवाळीनंतर अवतरलेल्या थंडीचा कडाका चांगला वाढल्यामुळे पुणेकरांना हुडहुडी भरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम म्हणून शहरासह जिल्हय़ाच्या परिसरात रात्री काही ठिकाणी शेकोटय़ा पेटल्याचे चित्र दिसू लागले आहे. नागरिक गरम कपडे घालून बाहेर पडताना दिसत आहेत. भरदुपारीही थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी शहरात कमाल तापमान १५.३ कमी नोंदले गेले. शहरात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘नीलोफर’ चक्रीवादळामुळे ऐन दिवाळीत कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रात व इतर ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यामुळे या भागात कमाल आणि किमान तापमान अचानक खाली आले होते. थंडीचा कडाका हा दिवाळीपासून कायम असून तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी खाली आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागल्यानंतर काही दिवसांमध्ये त्याचा कडाका वाढला. रात्री काही ठिकाणी शेकोटय़ासुद्धा पेटू लागल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे. खास करून सायंकाळनंतर आणि सकाळी थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. नागरिक रात्री बाहेर पडताना गरम कपडे घालूनच बाहेर पडत आहेत. थंडी वाढल्यामुळे नागरिकांनी गरम कपडे खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. त्याबरोबरच सकाळी बागांमध्ये फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागात थंडी वाढली आहे. अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांपर्यंत खाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान सातारा येथे १३.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सोलापूर, सांगली या पट्टय़ांतही थंडीचा कडाका वाढला आहे. येत्या चोवीस तासांत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.