विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक तक्रारींची नोंद झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अवघ्या एका महिन्यात सर्व तक्रारींचा निपटारा केला आहे. सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तक्रार निवारण समितीकडे पुणे विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांची एकही तक्रार नाही.
विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले. मे महिन्यापासून सुरू झालेल्या या संकेतस्थळावर गेले अनेक महिने सर्वाधिक तक्रारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबाबत होत्या. या संकेतस्थळावर नोंदवण्यात आलेली पहिली तक्रारही विद्यापीठाची होती. सर्वाधिक तक्रारींचाही विक्रम केल्यानंतर विद्यापीठाने त्या तक्रारी सर्वात आधी निकालात काढण्यातही बाजी मारली आहे. विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांनी ३७ तक्रारींची नोंद केली होती. त्यानंतर यातील ११ तक्रारी मागे घेतल्या गेल्या. उरलेल्या २६ तक्रारी महिनाभराच्या कालावधीत विद्यापीठाने निकाली काढल्या आहेत. यातील बहुतेक तक्रारी या महाविद्यालयांच्या किंवा विद्यापीठाच्या पातळीवर मिळणाऱ्या सुविधांची वानवा, प्रशासकीय अडचणी, निकाल, शुल्क यांबाबत होत्या, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली. विद्यार्थ्यांशी आणि महाविद्यालयांशी बोलून या तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत.
आयोगाने सुरू केलेल्या या संकेतस्थळावर सध्या देशभरातील २७४ विद्यापीठांबाबत १ हजार १५८ तक्रारी प्रलंबित असल्याचे दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांत १९३ तक्रारी विद्यापीठांकडून सोडवण्यात आल्या आहेत.  राज्यातील मुंबई विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, भारती विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ आणि टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस या विद्यापीठांबद्दल विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत.
याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले,‘‘विद्यापीठाबरोबरच महाविद्यालयांच्या पातळीवर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. विद्यापीठाकडे तक्रार आल्यानंतर ती महाविद्यालयाकडे पाठवून तिचे निवारण झाल्याची पोच घेतली जाते. तक्रार मागे घेतल्याचे विद्यार्थ्यांकडून लेखी घेण्यात येते. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये रॅगिंग, महिलांच्या तक्रारी, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यांबाबत महविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यामाध्यमातून अनेक प्रकरणे निकाली निघाली आहेत.’’