गुन्हेविषयक अहवालाचे प्रकाशन

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुन्हेविषयक अहवालाचे (क्राईम इन महाराष्ट्र २०१५) प्रकाशन सोमवारी झाले. सन २०१५ मध्ये राज्यभरात ४ लाख २३ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. स्त्री अत्याचार तसेच महिलांचे अपहरण, बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. बालकांवरील अत्याचार तसेच अनुसूचित जातींवरील अत्याचारात वाढ झाल्याचे निरीक्षण गुन्हेविषयक अहवालात नोंदवण्यात आले आहे. दखलपात्र गुन्ह्य़ांच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात (दोषसिद्धी) वाढ झाली आहे. दोषसिद्धीचे प्रमाण १९ टक्क्य़ांवरून ३३ टक्क्य़ांपर्यंत वाढले आहे.

गुन्हेविषयक अहवाल सन २०१५ चे प्रकाशन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल याप्रसंगी उपस्थित होते. सन २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे.

स्त्री अत्याचाराचे ३१ हजार १२६ गुन्हे दाखल झाले आहेत. स्त्री अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात दाखल झाले आहेत. बालकांवरील अत्याचारात लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, अपहरण, बलात्कार, जाळपोळ, दंगा, दरोडा, जबरी चोरी अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. ठाणे शहरात हिंसात्मक गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. अनुसूचित जातींवरील अत्याचारांच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. मालमत्ताविषयक गुन्ह्य़ात (प्रॉपर्टी ऑफेन्स) वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सन २०१५ मध्ये राज्यभरात ८७ हजार ३२९ गुन्हे दाखल झाले आहेत. चोरीचे ६१ हजार १२८ गुन्हे दाखल झाले आहेत. चोरीचे सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात दाखल झाले आहेत. त्याखालोखाल पुणे शहरात चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

दृष्टिक्षेपात अहवाल

*  रस्ते अपघातात १३ हजार ६८५ जणांचा मृत्यू

*  राज्यात दर दोन तासांनी तिघांचा अपघाती मृत्यू

*  स्त्री अत्याचाराचे गुन्हे वाढले, मुंबईत ४ हजार ८०३ गुन्हे दाखल

*  सन २०१५ मध्ये ४ लाख २३ हजार दखलपात्र गुन्हे दाखल

*  सोनसाखळी हिसकावण्याच्या गुन्ह्य़ांमध्ये घट

*  १३ हजार ७३३ आर्थिक गुन्हे दाखल

*  २ हजार १९५ सायबर गुन्हे दाखल

*  राज्यात २५०९ खुनाचे गुन्हे

*  अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी कृत्यातील सहभाग चिंताजनक

*  दरोडय़ाचे सर्वाधिक गुन्हे नगर आणि पुणे जिल्ह्य़ात

आर्थिक आणि सायबर गुन्ह्य़ांचा टक्का वाढला

सन २०१५ मध्ये राज्यात १३ हजार ७३३ आर्थिक गुन्हे दाखल झाले आहेत, तर सायबर गुन्ह्य़ांमध्ये सन २०१४ च्या तुलनेत  १६.९८ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. सन २०१५ मध्ये राज्यात २ हजार १९५ गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर गुन्ह्य़ांचा छडा लावून ८२५ आरोपींना अटक करण्यात आली. मुंबई शहरात ९७९ सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ ठाणे आणि औरंगाबाद शहरांमध्ये सायबर गुन्हे दाखल झाले आहेत.

महिला सजग झाल्यामुळे तक्रारीत वाढ

स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याचे सीआयडीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अहवालाचे प्रकाशन करताना याबाबत कारणमीमांसा केली. महिला सजग झाल्या आहेत. त्यामुळे स्त्री अत्याचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, स्त्री अत्याचाराचे गुन्हे न्यायालयात सिद्ध होत नाहीत. आरोपी निर्दोष सुटतात. यामागची कारणेदेखील वेगळी आहेत. तक्रारदार महिलेने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा तक्रारदार महिलेचा विवाह होतो. त्यानंतर ती न्यायालयासमोर उभी राहू शकत नाही. त्याचा फायदा घेऊन आरोपी निदरेष सुटतात. स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्य़ात शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले तर आरोपींना जरब बसेल, असे शुक्ला यांनी  स्पष्ट  केले.