स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीनीकडे घरभाडे मागण घरमालकीणीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय निर्देशांचं उल्लंघन केल्या प्रकरणी घरमालकीणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही विद्यार्थीनी चंद्रपूर येथील आहे. घरभाडे मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना असावी.

चंद्रपूर जिल्ह्याची रहिवाशी असलेली मेघा बोथरा ही विद्यार्थीनी सध्या पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करते. या प्रकरणाविषयी माहिती देताना पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग म्हणाले,”मेघा चंद्रपूर असून, ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली आहे. ती पुण्यातील नवी पेठ भागात खोली भाड्यानं घेऊन राहते,” असं सिंग म्हणाले.

तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घरमालिकीणीची माहिती काढली. श्रेया लिमण असं घरमालकीणीचं नाव आहे. मेघा घरभाड्यापोटी महिन्याला १७०० रुपये देते. पण, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं सरकारनं लॉकडाउन लागू केला. त्यामुळे तिच्याकडे घरभाडं देण्यासाठी पैसे आले नाही. पोलिसांच्या माहितीप्रमाणे लिमण यांनी मेघाकडे घरभाड्याची मागणी केली. तसेच घरभाडं देणं शक्य नसेल, तर खोली रिकामी करण्यास सांगितलं.

२४ मार्चपासून देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारनं पुढील तीन महिने घरभाडे न मागण्याचे निर्देश दिले होते. “विद्यार्थीने तक्रार दाखल केल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात सरकारनं जारी केलेल्या निर्देशाप्रमाणे महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असं सिंग म्हणाले.