क्षुल्लक वादामुळे स्वत:चा जीव देण्याचा प्रकार पुणे येथे घडला आहे. पुण्यातील चतुश्रुंगी परिसरात जनवाडीमध्ये दहा रुपयांवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतले आहे. दहा रुपयांवरुन शेजाऱ्यांशी महिलेचा वाद झाला होता. या वादात महिलेला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर महिलेने स्वत:ला पेटवून घेतले, यात गंभीररित्या भाजल्याने तिचा मृत्यू झाला. सुंदरम्मा परशुराम शेलार (वय ३० ) असे पेटवून घेतलेल्या महिलेचे नाव आहे.

चतुश्रुंगी परिसरात राहणाऱ्या सुंदरम्मा शेलार यांनी आपला मुलगा राहुल याला १० रुपये देऊन किराणा दुकानातून साहित्य आणण्यास सांगितले होते. राहुल दुकानात जात असताना शेजारच्या मुलीने त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेतले. राहुलने याची माहिती आई सुंदरम्माला सांगितली. सुंदरम्मा या याबाबत जाब विचारायला  शेजाऱ्यांकडे गेल्या. त्यावेळी शेजाऱ्यांशी  त्यांचे भांडण झाले. या भांडणावेळी सुंदरम्मा यांचा अपमान केला. त्यांना शिवीगाळ आणि मारहाण ही करण्यात आली. या प्रकारानंतर सुंदरम्मा या घरी आल्या आणि डिझेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले. त्यांना ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. सुंदरम्मा यांचे पती हे मोलमजुरी करतात.
याप्रकरणी संशयित आरोपी भारती गायकवाड आणि हरीष गायकवाड यांच्याविरोधात चतुश्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर १२ वर्षीय पुजा गायकवाडला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.