उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात महिलेवर सामूहिक बलात्काराची नोंदवलेली तक्रार खोटी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. पारनेरमधील दोन गुंडांनी पूर्व वैमनस्यातून महिलेचा आधार घेत दोघांना तुरुंगात पाठवण्याठी हा सर्व प्रकार केला होता. उरुळी कांचन- जेजुरी मार्गावर शिंदवणे  घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा आणि लोणी काळभोर पोलिसांनी बलात्काराच्या प्रकरणाचा तपास करताना ही तक्रार खोटे असल्याचे उघडकीस आणले. सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केलेल्या महिलेने पोलिसांसमोर यासंदर्भात कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदवणे येथे घटनेनंतर संबंधीत महिलेकडे आधिक चौकशी करत असताना काही संशयास्पद माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला. यावेळी पारनेर येथील नारायण गव्हाण आणि संदीप जगदाळे या दोन गुडांनी पूर्व वैमनस्यातून आपल्याच गावातील प्रकाश चव्हाण आणि अजय नवले यांना तुरुंगात पाठविण्यासाठी केडगाव येथील महिलेच्या माध्यमातून बलात्काराचा कट रचण्यात आल्याचे समोर आले. या दोघांनी महिलेवर बलात्कार केल्याची साक्ष देण्यासाठी दोन तरुणांना पैसे देण्यात आले होते. तसेच संबंधीत महिलेनेही गव्हाण आणि जगदाळे यांच्या सांगण्यावरून खोटी फिर्याद दिल्याची कबुली दिली.

देव दर्शनाहून घरी परतत असताना धमकावून मोटारचालक आणि त्याच्या साथीदाराने  बलात्कार केल्याची तक्रार महिलेने दाखल केली होती. या तक्रारीनंतर  पीडित महिलेने दिलेल्या मोटारीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींची नावे शोधून काढून शनिवारी त्यांना ताब्यात घेतले होते. तक्रारदार महिला मूळची दौंड तालुक्यातील केडगावची रहिवासी आहे.