३० जून रोजी पुण्यातील एक महिला परदेशातून भारतात परतली. मुंबईत आल्यानंतर क्वारंटाइन होण्याऐवजी महिला मुंबईतून ही महिला पुण्यात गेली. पुण्यातही क्वारंटाइन न होता, थेट कोथरूड परिसरातील आपल्या घरी परतली. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना राबवत असताना महिलेनं चक्क क्वारंटाईन होण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत महिलेवर गुन्हा दाखल केला.

करोनामुळे सध्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद असली, तरी परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारनं वंदे भारत मिशन अभियान हाती घेतलं आहे. या अभियानातंर्गत आतापर्यंत हजारो भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलं. यात पुण्यातही अनेक नागरिक दाखल झाले आहेत.

३० जून रोजी इतर प्रवाशांसोबत पुण्यातील ३७ वर्षीय महिला ओमानमधून भारतात परतली. नियमाप्रमाणे या महिलेनं परदेशातून आल्यानंतर लगेच मुंबईत सात क्वारंटाइन होणं आवश्यक होतं. मात्र, ही महिला मुंबईमार्गे पुण्यात पोहोचली. इतकंच नाही. तर पुण्यातही क्वारंटाइन न होता महिला कोथरूड परिसरातील आपल्या घरी पोहोचली. प्रशासनाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महिलेला क्वारंटाइन होण्याची सूचना दिली. मात्र, महिलेनं क्वारंटाइन होण्यास नकार दिला.

त्यानंतर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेलचे अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी महिलेविरोधात तक्रार दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थान कायद्यातंर्गत महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. यापूर्वी ही अशीच एक घटना पुण्यात घडली होती. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परदेशातून आलेल्या या व्यक्तीनंही क्वारंटाइन होण्यास नकार दिला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.