पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एका महिलेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलीय. या महिलेचा पती सतत तिला कधी मुलीच्या नावावर पैसे ठेवायचे, तर कधी कापूस लागवडीसाठी पैसे पाहिजे असं सांगून माहेरुन पैसे आणायला सांगायचा. तुझ्या आई वडिलांकडून पैसे घेऊन ये, या सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मागणीला आणि त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केलीय.

आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव रोहिणी सातपुते असं असून ती ३० वर्षांची होती. या प्रकरणामध्ये आता रोहिणीचा पती रणजित, सासरे लहू आणि सासू अलकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातपुते कुटुंबिय कुंजीरवाडी येथे राहते. या तिघांविरोधात गुन्हा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहिणीचा विवाह रणजित यांच्यासोबत २०११ मध्ये झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत रोहिणीकडे कधी आजारपणाचे बिलाचं तर कधी मुलीच्या नावावर पैसे ठेवण्याचं तर कधी अगदी कापूस लागवडीसाठी पैसे मागण्याचा सपाटा सातपुते कुटुंबियांनी लावला होता. वाटेल त्या कारणासाठी रोहिणीच्या माहेरुन सातपुते कुटुंबीय पैसे मागायचे. तुझ्या आई वडीलांकडून पैसे घेऊन ये असं रणजित रोहिणीला अनेकदा सांगायचा. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं देखील झाली. आरोपी रणजित पैशांवरून रोहिणीला मारहाण देखील करायला. या सततच्या त्रासाला कंटाळून रोहिणीने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिलीय.