पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास तिच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. नातेवाईकांना या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली आहे. येथील पिंपळे गुरव परिसरातील देवकर पार्कमधील एका अनधिकृत इमारतीवर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास कारवाई सुरू होती. त्यावेळी देवीबाई राम पवार (वय ३०) या महिलेने कारवाई रोखण्यासाठी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत महिलेचे दोन्ही पाय आणि एक हात जायबंदी झाला होता. त्यानंतर तिला उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेत मृतदेह घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांची समज काढून मृतदेह हा औंध जिल्ह्यातील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. मात्र, शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी देवीबाई पवार यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तब्बल ५०० नागरिक रात्रीपासून औंध जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडून बसले आहेत. मात्र, जोपर्यंत संबंधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाई होत नाहीत तोपर्यंत देवीबाई पवार यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. यावर आता पालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.