News Flash

गुन्हे वृत्त ; परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला गंडा

दरम्यान, महिलेने अज्ञाताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, तेव्हा मोबाइल क्रमांक आणि समाजमाध्यमावरील खाते बंद असल्याचे निदर्शनास आले.

परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला गंडा

परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला अज्ञाताने चार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला घटस्फोटित आहे. सहा महिन्यांपूर्वी अज्ञाताने महिलेला समाजमाध्यमावर मैत्रीची विनंती पाठविली होती. महिलेने त्याची विनंती स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला.

अज्ञाताने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. लंडनमधील एका व्यापारी नौकानयन कंपनीत कामाला असल्याची बतावणी त्याने केली.

त्यानंतर महिलेला परदेशातून हिरेजडित दागिने, मोबाइल संच तसेच वस्त्रप्रावरणे पाठविण्याचे आमिष दाखविले. महिलेने त्याच्या बतावणीवर विश्वास ठेवला.

त्यानंतर अज्ञाताने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भेटवस्तूंचे खोके दिल्ली आंतराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. भेटवस्तूंचे खोके ताब्यात घेण्यासाठी सीमा शुल्क जमा  करावे लागेल, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर महिलेने बँक खात्यात ४ लाख ९ हजार जमा केले.

दरम्यान, महिलेने अज्ञाताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, तेव्हा मोबाइल क्रमांक आणि समाजमाध्यमावरील खाते बंद असल्याचे निदर्शनास आले. महिलेने काही दिवसांपूर्वी खडक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जावरून पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली. समाजमाध्यमावर अनोळखी व्यक्ती बरोबर मैत्री करू नका, आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन  सायबर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी करण्यात आले. मात्र, पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे काणाडोळा करण्यात येत असल्याने अशा प्रकारे फसवणूक होण्याचे सत्र कायम आहे.

प्रवेशाच्या आमिषाने दिल्लीतील डॉक्टर युवतींची फसवणूक

शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने दिल्लीतील दोन डॉक्टर  युवतींची साडेसहा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका युवतीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अभिषेक, रूद्रप्रताप, महम्मद नासिम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवती आणि तिच्या मैत्रिणीला वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. गेल्या महिन्यात आरोपींनी तक्रारदार युवतीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. हडपसर भागातील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष त्यांनी तिला दाखविले. त्यानंतर युवतीला  येरवडा भागातील कल्याणीनगर भागात बोलावण्यात आले. व्यवस्थापन कोटय़ातून अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देतो, असे आरोपींनी तिला सांगितले. तक्रारदार युवती तसेच तिच्या मैत्रिणीकडून आरोपींनी साडेसहा लाख रुपये उकळले. त्यानंतर दोघींनी आरोपींच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपींनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 5:12 am

Web Title: women fraud london doctor fraud admission akp 94
Next Stories
1 रेल्वे गाडीवर दरोडय़ाचा प्रयत्न; चोरटय़ांची टोळी जेरबंद
2 बनावट सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याच्या गोदामावर छापा
3 पिंपरीत नव्या पोलीस आयुक्तांपुढे गुन्हेगारी, अपुऱ्या मनुष्यबळाचे आव्हान
Just Now!
X