पुणे ते दौंड या पट्टय़ातील नागरिक मोठय़ा प्रमाणावर पुण्यात नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने येत असताना पुणे- दौंड मार्गावर धावणाऱ्या रेल्वेच्या शटल गाडीला मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. प्रवाशांमध्ये महिलांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे महिलांसाठी आरक्षित असलेला डबा अपुरा पडत असल्याने इतर डब्यांमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीमध्ये महिला प्रवाशांची कुचंबना होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. महिलांच्या या तक्रारींची रेल्वे पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
पुणे ते दौेंड या पट्टय़ातून पुण्याच्या विविध भागांमध्ये नोकरी, शिक्षण किंवा व्यापाराच्या दृष्टीने रोजच येणाऱ्या प्रवाशांची संख्या सध्या मोठी आहे. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वेतील प्रवास स्वस्त व खात्रीलायक असल्याने गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील प्रवाशांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत या मार्गावर गाडय़ांची संख्या वाढलेली नाही. पुण्याकडे येण्यासाठी दौंड- पुणे ही रेल्वेची शटल सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी दौंड स्थानकावरून सुटते. दौंडच्या पुढील प्रत्येक स्थानकावर या गाडीची वाट पाहणारे प्रवासी मोठय़ा संख्येने असतात.
महिला प्रवाशांसाठी या गाडीमध्ये एक डबा आरक्षित करण्यात आला आहे. मात्र, हा डबा दौंड स्थानकातच भरून जातो. त्यामुळे पुढील स्थानकावर थांबलेल्या महिला प्रवाशांना इतर डब्यांचा आधार घ्यावा लागतो. महिला प्रवाशांसाठी आरक्षित असलेल्या डब्याच्या शेजारील अर्धा डबा महिलांसाठी देण्यात आला आहे. मात्र, दौंडनंतर लोणी व इतर स्थानकावर या डब्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर पुरू ष प्रवासी चढतात व या प्रकारातून गेल्या काही दिवसांपासून महिला व पुरूष प्रवाशांमध्ये वाद होण्याचे प्रसंग घडत आहेत. हा वाद दोन दिवसांपूर्वी थेट रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन साध्या वेशातील महिला व पुरुष प्रवासी दौंडपासून गाडीमध्ये पाठविले. त्यानुसार या गाडीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. महिलांची संख्या मोठी असल्याने आणखी डबे महिला प्रवाशांसाठी आरक्षित करण्याची मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात आली आहे.
महिला प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित पुरुष प्रवाशांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. त्यांच्याशी चर्चा करून महिला प्रवाशांच्या समस्येवर तोडगा काढण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन दुसऱ्या डब्यातही केवळ महिला प्रवासी प्रवास करतील, असे ठरविण्यात आले आहे. अधिक डब्यांच्या मागणीसाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. महिलांशी सौजन्याने वागण्याचे त्याचप्रमाणे त्यांचा आत्मसन्मान दुखावला जाणार नाही, असे वर्तन ठेवण्याची समज देण्यात आली आहे.
– अभय परमार,
पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे.