घराचा दरवाजा बंद झाला की लोकशाही संपते, व्यक्तिगत आयुष्यात हुकूमशाही चालते. स्त्रियांच्या हक्कांविषयीची चर्चा पुरूषविरोधी नसून समानतेची आहे.
महिलांच्या समानतेचा मुद्दा केवळ व्याख्यानात, लिखाणात, सार्वजनिक आयुष्यात चर्चिला जातो, तो व्यक्तिगत आयुष्यात चर्चेला यायला हवा, असा सूर पिंपरीतील एका परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
पिंपरी पालिकेच्या वतीने ‘महिलांच्या विकासातील अडथळे’ या विषयावरील परिसंवादात पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे, आनंद पवार, रेखा मेश्राम सहभागी झाले होते. पवार म्हणाले,की महिलांच्या विकासातील अडथळ्यांची चर्चा फक्त चर्चासत्रांमध्ये होते, ती वैयक्तिक आयुष्यात अथवा कुटुंबांमध्ये होत नाही. ही चर्चा पुरूष विरोधी नाही तर समानतेची आहे. पुरूषांना समतेची भीती वाटते. समाज पुरूषप्रधान आहे. पितृत्व हे स्त्रियांच्या कामावर, संपत्तीवर नियंत्रण करते. स्त्रियांचा विकास कसा व्हावा, याविषयीच्या अपेक्षा त्यांनाच व्यक्त करू द्या. भिडे म्हणाल्या,‘‘महात्मा फुले यांनी समानता शिकवली, मात्र, आपण विषमता निर्माण केली. स्त्री समानतेचा विचार समाजातील सर्व वर्गात होत नाही, हाच महत्त्वाचा अडथळा आहे. स्त्रियांची आपण नुसतीच गौरव गाणी गातो. जोपर्यंत स्त्रिया स्वत:चा बाणा दाखवणार नाहीत, तोपर्यंत महिला सबलीकरण होणार नाही. आरक्षणामुळे स्त्री -पुरूष समानता लगेचच येणार नाही, त्याबाबत समाजात प्रबोधन होण्याची गरज आहे.’’  मेश्राम म्हणाल्या,‘‘अडथळ्यांना सुरूवात कुटुंबातून होते. मुला-मुलीतील भेद घरापासून सुरू होतो. पुरूषांची मानसिकता दूर होत नाही, तोपर्यंत महिलांच्या विकासातील अडथळे दूर होणार नाहीत. स्त्रियांनी पुढे जायला हवे, त्यासाठी पुरूषांची तेवढीच साथ महत्त्वाची आहे.’’ परिसंवादाचे सूत्रसंचालन अश्विनी सातव यांनी केले.