पोलीस हवालदाराकडून महिला शिपायासोबत असभ्य वर्तन

महिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा करायचा नाही, पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या महिलेला न्याय दिला पाहिजे, तिच्या तक्रारीचे निराकरण केले पाहिजे, असे स्पष्ट आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिले असताना मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने महिला पोलीस शिपायासोबत असभ्य वर्तन केल्याची घटना उघडकीस आल्याने पोलीस खात्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस ठाण्यात महिला पोलीस असुरक्षित असल्याची प्रतिक्रिया पोलीस खात्यात उमटली आहे.

शिस्तीचे खाते अशी ओळख असलेल्या पोलीस खात्यात महिलांचा टक्का वाढला आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून महिला पोलीस बारा तास काम करतात. एकेकाळी पोलीस खात्यात काम करणाऱ्या महिलांविषयी नकारात्मक दृष्टिकोन बाळगला जायचा. पोलीस खात्यात महिलांचे काय काम, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जायची. गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. अनेक महिला पोलीस खात्यात आवडीने येतात. पोलीस अधिकारी किंवा शिपाई होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर पोलीस खात्यात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या तरुणी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करतात. पोलीस उपनिरीक्षक, उपअधीक्षकपदाच्या परीक्षा देतात. बारा तासांची डय़ुटी सांभाळून अनेक तरुणी परीक्षांची तयारी करतात.

पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांच्या तक्रारींचे निराकरण करा, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात पोलीस दलात काम करणाऱ्या महिलांविषयी सहकारी पोलीस नकारात्मक दृष्टिकोन बाळगतात. महिला पोलिसांची फारशी दखल घेतली जात नाही किंबहुना महिला पोलिसांकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून बघण्याची मानसिकता आजही कायम असल्याची प्रतिक्रिया एका महिला पोलीस शिपायाने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे की काय आमच्या कामाचे ठिकाणदेखील कधीकधी असुरक्षित वाटते, असे तिने नमूद केले.

नेमके प्रकरण काय?

मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात रात्रपाळीत कामावर असलेल्या महिला पोलीस शिपायाबरोबर हवालदाराने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. एका महिला पोलिसाने दिलेल्या फिर्यादीनुसार हवालदार राजेंद्र सीताराम मोरे (वय ४५, रा. गुजरवाडी, कात्रज) याला अटक करण्यात आली. तक्रारदार महिला पोलीस मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात रात्रपाळीत कामावर होती. त्या वेळी मोरे ठाणे अंमलदार म्हणून काम पाहात होता. संगणकावर काम करणाऱ्या महिला पोलिसाबरोबर मध्यरात्री मोरे याने अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, असे महिला पोलिसाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस हवालदार राजेंद्र मोरे याची खातेअंतर्गत चौकशी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल. सामान्य महिला किंवा पोलीस महिलेने तक्रार दिल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश परिमंडल दोनमधील सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत.     – डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस उपायुक्त, परिमंडल दोन