विश्रांतवाडी भागातील घटना

पुणे : रस्त्यात भांडणे करणाऱ्या मद्यपींवर कारवाई करण्यास गेलेल्या महिला पोलीस हवालदाराला दोघांनी धक्काबुक्की केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली.

पोलीस हवालदार वैशाली अभंगराव यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम ११ आणि आपत्ती व्यवस्थापन २००५  या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी विश्रांतवाडी पोलीस वसाहतीसमोरील रस्त्यावर दोघे जण गोंधळ घालत होते. त्यांनी मद्यप्राशन केले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाकडे केली. त्यानंतर अभंगराव तेथे गेल्या. त्यांनी दोघांना समजावून सांगितले. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालू नका, असे त्यांनी सांगितले.

तेव्हा दोघा मद्यपींनी त्यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. अभंगराव यांना धक्काबुक्की करण्यात आली. पसार झालेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे तपास करत आहेत.