पुण्यातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच पिंपरी- चिंचवडमध्ये एम्पायर इस्टेट येथे लाल रंगाच्या कापडी पिशवीत ४३ जिवंत काडतुसे सापडली आहेत. कचरा वेचक महिलेला ही काडतुसे सापडली असून या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

गुरुवारी रात्री सातच्या सुमारास ५८ वर्षीय कचरा वेचक महिला एम्पायर इस्टेटमधील ब्रिजखाली रेल्वे रुळालगत कचरा गोळा करत होती.  महिलेला लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये तब्बल ४३ जिवंत काडतुसे सापडली. महिलेने ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पिशवी ताब्यात घेतली. पिशवीमध्ये एकूण ३०३ रायफलची २६ जिवंत काडतुसे, १० चंदेरी रंगाचे बाराबोर २.२ चे आणि ०७ नग लाल रंगाचे बाराबोर अशी एकूण ४३ जिवंत काडतुसे सापडली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलायाच्या गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळेच पुरावा नष्ट करण्यासाठी जिवंत काडतुसे रेल्वे रुळालगत फेकली असावीत, संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.