‘महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना फक्त आरक्षण देऊन उपयोग नाही, तर निर्णय घेण्याचे अधिकारही मिळाले पाहिजेत. मात्र, त्यासाठी समाजव्यवस्थेत मुळापासूनच बदल होणे आणि अधिकाधिक स्त्रिया शिक्षित होणे आवश्यक आहे,’ असे मत पुनावाला फाऊंडेशनच्या लीला पुनावाला यांनी रविवारी व्यक्त केले.
पाचव्या भारतीय छात्र संसदेत आयोजित करण्यात आलेल्या ‘३३ टक्के आरक्षण हे महिला सक्षमीकरणाचे साधन आहे का?’ या विषयावर पूनावाला बोलत होत्या. यावेळी खासदार पूनम महाजन -राव, आंध्रप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष डॉ. कोडेला सिवा प्रसाद राव, आमदार यशोमती ठाकूर, केरळमधील आमदार शफी परंबील, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, राहूल कराड आदी उपस्थित होते.
यावेळी पुनावाला म्हणाल्या, ‘स्त्रियांना शारीरिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी त्यांना संधी दिल्या पाहिजेत. आज महिला अनेक क्षेत्रांत आघाडीवर असल्या तरी त्याची संख्या कमी आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन महिला सक्षमीकरणाची चळवळ पुढे नेली पाहिजे.’
छात्र संसदेत ‘भारतातील आदर्श व्यक्तिमत्त्वे: बदलांचे दूत’ या विषयावर उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक शैलजाकांत मिश्रा, भाजपच्या राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीचे मुख्य समन्वयक श्रीकांत भारती, मेघालय विधानसभेचे अध्यक्ष अबू ताहेर मोंदेल आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी ‘स्टॉप अ‍ॅसिड अ‍ॅटॅक मिशन’ या संस्थेच्या सोनिया चौधरी आणि गणितज्ञ आनंद कुमार यांना ‘हिरोज ऑफ इंडिया २०१४’ पुरस्कार देण्यात आला.
यावेळी मिश्रा म्हणाले, ‘इतिहासकारांनी आदर्शाचे यशच फक्त समाजासमोर आणल्यामुळे ‘हिरो’ या संकल्पनेबद्दलच युवक गोंधळलेले आहेत. मात्र, प्रत्येक हिरो हा अपयशाला सामोरा गेला आहे. तरीही तो हिरो झाला कारण त्याने संघर्ष सुरूच ठेवला, हे लक्षात घ्यायला हवे.’
‘चित्रपट आणि क्रिकेट क्षेत्रापेक्षा राजकारणाला प्राधान्य’ या विषयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, क्रीडा समालोचक विक्रम साठय़े, हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष ब्रिज बिहारीलाल बुटैल, मध्यप्रदेशचे आमदार जीतू पटवारी, आंध्रप्रदेश मधील आमदार सी. एन. अश्वथनारायण यांनी आपले विचार व्यक्त केले.