‘‘स्त्रियांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. लहानपणापासूनच रंगमंचावर काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, आयएसआय होण्यासाठीचे बळ पतीने दिले आणि त्यामुळे आयएसआय झाले..’’
राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण आपला अनुभव सांगत होत्या. निमित्त होते, महाराष्ट्र साहित्य परिषद, सी. ए. आर्टस् अॅन्ड स्पोर्ट्स, महाराष्ट्र चित्पावन संघ व युनिक फाउंडेशन सर्कल यांच्यावतीने आयोजित परिसंवादाचे. या संस्थांनी महिला दिनानिमित्त ‘सन्मान स्त्रीत्वाचा.. स्वत्वाचा’ या विषयांतर्गत ‘संघर्षगाथा तुझी-माझी’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्यात श्रीमती सत्यनारायण तसेच, अभिजित एअर सेफ्टी फाउंडेशनच्या कविता गाडगीळ आणि यू.एस.के. फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे या सहभागी झाल्या होत्या.
या वेळी श्रीमती सत्यनारायण यांनी राज्य निवडणूक आयुक्त म्हणून संघर्ष करताना येणाऱ्या अडचणींना तोंड द्यावे लागले, याबाबत अनुभवही सांगितले. या वेळी उषा काकडे म्हणाल्या की, स्त्री जेवढी व्यवसायात बारकाईने लक्ष देऊ शकते, तेवढे पुरूष देऊ शकत नाहीत. पती संजय काकडे यांच्यासोबत व्यवसायात काम सुरू केल्यानंतर झालेला त्रास व ३ हजार मुलींना सुरक्षिततेचे प्रशिक्षण देण्यापर्यंतचा प्रवास काकडे यांनी या वेळी सांगितला. ‘स्त्रियांचे संघर्ष, त्या संघर्षांचा लढा देण्याऱ्या स्त्रिया यांची गाथा या परिसंवादातून मांडली गेली. युद्धामध्ये गमावलेल्या मुलाबद्दल हळहळ व्यक्त करत अभिजित एअर सेफ्टी फाउंडेशनची केलेली सुरूवात कविता गाडगीळ यांनी सांगितली.
या प्रसंगी सी.ए.आर्ट्स अॅन्ड स्पोर्ट्सच्या रेखा धामणकर, महाराष्ट्र चित्पावन संघाचे हिमानी सावरकर व युनिक फाउंडेशन सर्कल सुरेखा माने आदी उपस्थित होत्या.