‘कामाच्या ठिकाणी स्त्रियांना ‘कोटा सिस्टिम’सारखी वेगळं पाडल्याची भावना नको आहे. स्त्रियांसाठी विशेष धोरणे आखताना ‘सर्वासाठी सर्व गोष्टी समान’ हे तत्त्व विसरता कामा नये. तरच ती स्त्री- पुरूष समानतेकडे वाटचाल असेल.’ अशी मते महिला दिनानिमित्त ‘कमिन्स’ कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात उपस्थितांनी व्यक्त केली.
कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरूष समानतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी विविध कंपन्यांतर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची चर्चा या वेळी करण्यात आली. कमिन्सच्या ‘न्यू अँड रेकॉन पार्ट्स’चे भारतातील प्रमुख संदीप सिन्हा, कमिन्स टबरे टेक्नॉलॉजीजच्या मनुष्यबळ विकास संचालक कॅरलीन कर्टझ्, अमेरिकेतील ‘डेलॉइट’ कंपनीच्या ‘इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी’ प्रमुख पूजा कुमार, झेन्सार टेक्नॉलॉजीज्चे प्रमुख कार्यकारी अधिकारी गणेश नटराजन, ‘जॉन डीर’ कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे संचालक राजाराम रमानी, ‘टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर’च्या मनुष्यबळ व्यवस्थापन प्रतिनिधी सुकन्या पटवर्धन आदींनी या चर्चेत भाग घेतला.
पटवर्धन म्हणाल्या, ‘‘घरकामासह अर्थार्जनही करताना घरातील सर्व कामे स्वत:च करण्याचा अट्टाहास स्त्रियांनी करू नये. निम्मी कामे आपल्या नवऱ्यावर सोपवावीत. व्यक्तीला आपली लैंगिक ओळख विसरून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता येणे, हेच समानतेकडे नेणारे ठरेल.’’
नटराजन म्हणाले,‘‘अडचणीच्या वेळी कार्यालयीन काम घरात बसून करणे हा एक चांगला उपाय ठरतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया घरी राहूनही अधिक काम करू शकतात असे निरीक्षण आहे.’’