रेल्वे स्थानकांवर कुचंबणा; ठेकेदार नसल्याचे संतापजनक उत्तर

पुणे : पुणे- लोणावळा मार्गावरील विविध स्थानकांवर महिला आणि अपंगांसाठी असलेली स्वच्छतागृहं रेल्वेने कुलूपबंद करून ठेवली आहेत. प्रामुख्याने महिला प्रवाशांची त्यामुळे मोठी गैरसोय होत असून, स्वच्छतागृहाच्या आवश्यकतेच्या वेळी कुचंबणाही सहन करावी लागते आहे. प्रवाशांमुळे कोटय़वधीचा महसूल मिळविणाऱ्या आणि ‘स्वच्छ भारत’ योजनेचा सातत्याने गाजावाजा करणाऱ्या रेल्वेला मात्र त्याचे काहीही सोयरेसुतक नाही. स्वच्छतागृहांसाठी ठेकेदार नसल्याचे संतापजनक कारण रेल्वेकडून देण्यात येत असून, या प्रकाराचा प्रवाशांकडून निषेध नोंदविण्यात येत आहे.

पुणे- लोणावळाच नव्हे, तर संपूर्ण पुणे रेल्वेच्या अख्यत्यारीत येणाऱ्या सर्वच ठिकाणी महिला स्वच्छतागृहांबाबत रेल्वे प्रशासनाकडून कमालीची उदासीनता दाखविण्यात येत आहे. पुणे ते लोणावळा हा पुणे रेल्वेचा सर्वात महत्त्वाचा आणि इतर कोणत्याही विभागाच्या तुलनेत सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग आहे. या मार्गावर विभागातील पुणे- लोणावळा ही एकमेव उपनगरीय लोकल वाहतूक होते. पुणे- लोणावळा लोकलच्या दिवसभरात ४४ फेऱ्या होतात. लोकलच्या प्रवाशांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांची संख्या सर्वाधिक आहे. महिलांची वाढती संख्या लक्षात घेता काही दिवसांपूर्वी पुणे- लोणावळा लोकलमध्ये महिलांसाठी आणखी एक अतिरिक्त डबा देण्यात आला आहे.

पुणे- लोणावळा दरम्यान मळवलीपर्यंतची स्थानके पुणे रेल्वेच्या हद्दीत येतात. जवळपास सर्वच छोटय़ा-मोठय़ा स्थानकांवर काही दिवसांपूर्वी नव्याने स्वच्छतागृहं बांधण्यात आली आहेत. त्यात महिला आणि अपंगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहं आहेत. मात्र, कामशेत, दापोडी, कासारवाडी, मळवली, बेगडेवाडी, घोरावाडी आदी विविध स्थानकांवर मागील वर्षभरापासून महिलांच्या स्वच्छतागृहांना कुलूप ठोकण्यात आले आहे. त्यामुळे स्वच्छतागृह असूनही त्याचा उपयोग करता येत नाही. स्वच्छतागृहाअभावी  महिलांना कुचंबणा सहन करावी लागते. अगदीच अडचणीच्या काळात एखाद्या आडोशाचा आधार घ्यावा लागत असल्याची लाजिरवाणी स्थिती आहे. त्यातच रेल्वे स्थानकाजवळील आडोशाच्या ठिकाणी आणि भिंतींलगत दारू, मटके किंवा गर्दूल्यांचे अड्डे असतात. त्याचाही नाहक त्रास महिलांसह इतर प्रवाशांनाही सहन करावा लागतो आहे.

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा काही दिवसांपूर्वी पुणे विभागातील दौरा पार पडला. त्या वेळी त्यांनी पुणे ते मळवली या विभागाचेही निरीक्षण केले. स्थानकातील स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याच्या दिवशी त्यांना दाखविण्यापुरते स्वच्छतागृहांचे कुलूप उघडण्यात आले होते. मात्र, त्यांची पाठ फिरताच परिस्थिती जैसे-थे झाली. स्थानकातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोठय़ा प्रमाणावर कामे करण्यात येत असल्याचा गाजावाजा रेल्वेकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्याला वेळोवेळी प्रसिद्धीही देण्यात येते. मात्र, वास्तवात परिस्थिती निराळीच असल्याचे महिलांच्या कुलूपबंद स्वच्छतागृहांच्या उदाहरणावरून दिसून येत आहे.

स्वच्छतागृहाची चावी स्टेशन मास्तरकडे!

स्थानकावरील महिलांच्या स्वच्छतागृहाला टाळे का, असा प्रश्न एखाद्या महिला प्रवाशाला पडल्यास आणि तिने याबाबत खंबीरपणे स्थानकातील कार्यालयात चौकशी केल्यास स्वच्छतागृहाची चावी स्टेशन मास्टरकडे मिळेल, ती त्यांच्याकडे मागा, असे उत्तर दिले जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले. स्वच्छतागृहाचा वापर करायचा झाल्यास महिलेने स्टेशन मास्टरकडे जाऊन चावीची मागणी करणे तितकेच गैर आणि किळसवाणे असल्याचे एका महिला प्रवाशाने सांगितले. स्वच्छतागृहाची तातडीने गरज असल्याच्या वेळी महिलांनी स्टेशन मास्टरला शोधत बसायचे काय, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात असून, महिलांची स्वच्छतागृह तातडीने खुली करावीत, अशी मागणी केली जात आहे.

हा महिला प्रवाशांच्या हक्कावर घाला आहे. त्यामुळे ठेकेदाराची वाट न पाहता पुणे- लोणावळा दरम्यानची सर्व स्वच्छतागृहे सुरू झाली पाहिजेत. स्वच्छतागृहाची सुविधा शक्यतो मोफत आवश्यक आहे. पण, ती स्वच्छ ठेवण्यासाठी काही पैसे द्यायलाही प्रवासी तयार आहे. प्रवाशांच्या गरजा काय, हे रेल्वेने तपासावे. केवळ वरिष्ठांचा दौरा असल्याच्या दिवशीच सर्वकाही आलबेल असल्याचे भासवू नये.

– हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा