संपत्तीच्या वादामधून निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेल्यानंतरही पोलिसांनी दाद न दिल्यामुळे ५० वर्षीय महिलेने, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अनिता गायकवाड असं या महिलेचं नाव असून, त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे अनिता गायकवाड बचावल्या.

अनिता गायकवाड आणि त्यांच्या बहिणीमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु आहेत. आपल्या बहिणीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अनिता यांनी निगडी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र निगडी पोलिसांनी गायकवाड यांची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या अनिता यांनी शुक्रवारी संध्याकाळी पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य दरवाज्यापाशी येत, पोलिस माझी तक्रार घेत नाहीत…मी इथेच जीव देते, असं म्हणत रॉकेल अंगावर ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिस मुख्यालयात ड्युटीवर असणारे पोलिस कर्मचारी हनुमंत बांगर यांनी तात्काळ धाव घेत अनिता गायकवाड यांचा आत्महत्येचा प्रयत्न थोपवला. या घटनेनंतर अनिता गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.