आरक्षण आणि जागतिकीकरण हे शब्दही ज्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा भटक्या विमुक्त समाजातील स्त्रिया नरकप्राय यातना भोगत आहेत. त्यांच्यासाठी गुलामगिरीचे जोखड असलेल्या जातपंचायती मोडल्या, तरच स्त्रियांचे जीवन सुसह्य़ होईल, असे मत पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा विमल मोरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे आयोजित पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्घाटन केरळमधील स्त्रीवादी कार्यकर्त्यां डॉ. मीरा वेलायुधन यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी संमेलनाध्यक्षा म्हणून विमल मोरे बोलत होत्या. ‘आयदान’कार ऊर्मिला पवार, गजलकार डॉ. अजीज नदाफ, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा मुक्ता मनोहर आणि चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी या प्रसंगी उपस्थित होत्या.
सौंदर्य हा स्त्रीला मिळालेला शाप आहे. वरवरच्या देखणेपणापेक्षाही स्त्रीच्या मनाचा विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून विमल मोरे म्हणाल्या, डोक्यावरचा पदर काढण्याचे धाडस नाही अशी भटक्या विमुक्त समाजातील बाई बोलण्याचे धैर्य कोठून आणणार? एकीकडे विज्ञानाच्या प्रगतीमुळे जीवन सुकर होत असले, तरी या समाजातील महिलांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले गेले आहे. मिक्सरमुळे पाटा-वरवंटा आणि व्हॅक्युम क्लीनरमुळे झाडू, टोपल्या असे व्यवसाय करणाऱ्या महिलांची उपासमार सुरू झाली. काही जमातींमध्ये तर डबा-बाटली गोळा करून डुकरे सांभाळण्यासाठी विवाह केले जातात. नाच करून, डोक्यावर मरीआईची टोपली घेत दारोदारी जाऊन महिलांनी पैसे कमवायचे आणि त्या पैशांवर पुरुषांनी दारू पिऊन मौज करायची, या जीवनामुळे महिलांची फरफट होत आहे. त्यातच जात पंचायतीची जोखड महिलेलाच दोषी धरून शिक्षा सुनावणार. एकविसाव्या शतकामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात असे चित्र असले, तरी परिघाबाहेरच्या स्त्रियांचे जीवन हलाखीचेच आहे. जात पंचायती मोडल्या तरच स्त्रियांचे जीवन सुसह्य़ होऊ शकेल.
स्त्रियांनी शिकू नये यासाठी पुरुषसत्ता कार्यरत असताना सावित्रीबाईंच्या प्रेरणेने आपण लिहू लागलो, असे सांगून ऊर्मिला पवार म्हणाल्या, दलित स्त्रियांची आत्मकथने आली. आमचे लेखन हे भांडण नाही तर विचार मांडण्यासाठी आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या समाजाला हलवून जागे करण्यासाठी आहे.
३१ टक्के मते घेऊन मोदी सत्तेवर आले आणि ६९ टक्के मते असूनही आमचा विद्रोह कमकुवत ठरला याकडे अजीज नदाफ यांनी लक्ष वेधले. ‘आसवांनो फार झाले दीन जन हे गार झाले, या फुलावर या कळ्यांवर गहिवरांचे वार झाले’ ही गजल त्यांनी सादर केली. मुक्ता मनोहर आणि प्रा. प्रतिमा परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्रोह जातीयवाद्यांच्या वळचणीला जातोय का?
अस्मिता आणि स्वाभिमान यातून निर्माण झालेला विद्रोह आता जातीयवाद्यांच्या वळचणीला जातोय का, याविषयी कठोर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. मीरा वेलायुधन यांनी व्यक्त केले. केरळमध्ये दलित ख्रिश्चनांच्या आरक्षणाचा प्रश्न होता. हा समाज वर्षांनुवर्षे काँग्रेस पक्षाबरोबर असताना यंदा मात्र, आरक्षणाच्या मुद्दय़ावर समाजाने नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे केरळात आंबेडकर आणि पेरियार यांच्याबरोबर प्रथमच मोदींचे बॅनर झळकले. ही विद्रोहाची पीछेहाट आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जातीयवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना विद्रोह देखील प्रस्थापित होतोय का याचाही विचार करावा, असे त्यांनी सांगितले.