करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात सध्या लॉकडाउन लागू आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. याचाच फटका एका नुकत्याच बाळंतीन झालेल्या महिलेलाही बसला आहे. आपले दीड महिन्यांचे बाळ आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबासह ही महिला गेल्या आठ दिवसांपासून रेसकोर्सजवळच्या फुटपाथवर राहत आहे.

आपल्यावर ओढवलेल्या या परिस्थितीबाबत सांगताना दीड महिन्यांच्या या बाळाची आई अंजली वाघमारे म्हणाल्या, “आम्ही मुळचे बारामती येथील असून अनेक वर्षांपासून माझे कुटुंब पुण्यात मोलमजुरीची कामं करुन आपली उपजीविका भागवत आहे. त्यांचा इथं निश्चित ठावठिकाणा नाही. त्यातच मी चार महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी पुण्यात आईकडे आले होते. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी ससून रूग्णालयात मला मुलगी झाली. रूग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राहण्याचा ठावठिकाणा नसल्याने आज इथ, तर उद्या तिथं असं आम्ही राहत होतो. दरम्यान, शहरात करोनाची मोठी साथ आल्याने सगळे रस्ते, वाहतूक बंद झाली. त्यामुळे आम्ही आठ दिवसापांसून फुटपाथवर अडकून पडलो आहोत.

या आठ दिवसांत दोन वेळा जोरदार पाऊस पडला होता. तेव्हा एका पुलाच्या खाली आम्ही रात्र काढल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्या पुढे म्हणाल्या, अनेक लोक आणि पोलीस आम्हाला जेवण, पाणी आणून देत आहेत, आमची काळजी घेत आहेत. पण माझी दीड महिन्याची मुलगी असल्याने आम्हला तिचीच जास्त काळजी वाटत आहे. त्यामुळे शासनाने आमच्यासाठी कुठंतरी निवाऱ्याची व्यवस्था करून द्यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.