महिला दिनाच्या निमित्ताने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातून महिला आणि पुरुषांसाठी ४० स्वच्छतागृहांची उभारणी

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता जाणवत असताना आणि त्यातही महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचे प्रमाण तुलनेने कमी असतानाच महिला दिनाच्या निमित्ताने स्मार्ट सिटी प्रकल्पाने महिला आणि पुरुषांसाठी खास डिझाईन असलेल्या स्वच्छतागृहांची उभारणी करत स्मार्ट पाऊल उचलले आहे.  औंध-बाणेर-बालेवाडी या भागात अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेली ४० स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी- सीएसआर) अंतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.जवळपास ३२ लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात स्वच्छतागृहांची मोठय़ा प्रमाणावर वानवा आहे

जवळपास ३२ लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात स्वच्छतागृहांची मोठय़ा प्रमाणावर वानवा आहे. स्वच्छतागृहांच्या उभारणीचे निकषही पाळले जात नसल्याचे चित्र वेळोवेळी पुढे आले आहे. किमान साठ व्यक्तींमागे एक स्वच्छतागृह अपेक्षित असताना तब्बल २६५ व्यक्तींमागे एक असे स्वच्छतागृहाचे प्रमाण असून प्रत्येकी दोन किलोमीटर अंतराच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छतागृहे असावीत, हा निकषही पूर्ण झाला नसल्याची वस्तुस्थिती महापालिकेच्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. शहरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि त्यांच्या अपुऱ्या संख्येबाबत ‘लोकसत्ता’ने सातत्याने वस्तुस्थिती मांडली होती. या पाश्र्वभूमीवर महिलांना स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला आहे.

महिलांसाठी १५ आणि पुरुषांसाठी २५ अशी एकूण ४० स्वच्छतागृहे औंध-बाणेर-बालेवाडी भागात उपलब्ध करून देण्यात येणार असून  ८ मार्चपासून ही सेवा सुरु होईल. बालेवाडी येथील साई चौकात प्रातिनिधिक स्वरुपात  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एचडीएफसी बँकेच्या  कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. एका स्वच्छालयामध्ये किमान चार व्यक्तींसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधा असून अंदाजे १२ लाख रुपये खर्च  असल्याची माहिती स्मार्ट सिटीकडून देण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकामापेक्षा स्वच्छतागृहे वेगळी असून एक्झॉस्ट फॅन न वापरता  नैसर्गिकपणे दुप्पट  हवा खेळती राहील अशी या स्वच्छतागृहाची रचना करण्यात आली आहे. मोफत वाय-फाय, नाणे टाकल्यावर नॅपकीन देणारी यंत्रे, आरसा, मोबाईल चार्जिगसाठी जागा, एफएम रेडिओ, बेबी डायपर बदलण्यासाठी जागा, सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर अशा आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्वच्छतागृहांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. हरित इमारत, नीचांकी कार्बन फुटप्रिंट, पूर्वरचना असलेले बांधकाम, धातूची भक्कम रचना, लॉक इंडिकेटर आणि हूक यामुळे महिलांसाठी स्वच्छतागृहे पूर्णपणे सुरक्षित आहेत. मलनि:सारण व्यवस्थापनासाठी खास सुविधा पुरवण्यात आली असून मलमूत्र स्वच्छतागृहातून पीव्हीसी सेप्टीक टाकीत आणि नंतर महापालिकेच्या सांडपाण्यात सोडण्यात येणार आहे. स्वच्छतागृहाची स्वच्छता दिवसातून तीन-चार वेळा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

वैशिष्टय़े

  • बहिस्थ सीसीटीव्हीने सुरक्षिततेची खबरदारी
  • दररोज तीन-चार वेळा स्वच्छता
  • एका स्वच्छतागृहाचा खर्च १२ लाख
  • वास्तुविशारदांकडून खास रचना