17 August 2019

News Flash

International Women’s Day 2018 सर्वत्र क्षेत्रांत ‘ती’ आघाडीवर

संशोधन, संरक्षण, संगीत, गिर्यारोहण अशा अनेक आघाडय़ांवर महिला विविधांगी काम करताना दिसत आहेत.

मार्च महिना जवळ येतो तसे महिला दिनाचे वेध लागतात. अनेक क्षेत्रांमध्ये कधी एकेकटय़ा, स्वतंत्रपणे आणि कधी गटांच्या स्वरूपात एकत्रितपणे उत्तम काम करणाऱ्या महिलांबद्दल या निमित्तानं बोललं जातं. संशोधन, संरक्षण, संगीत, गिर्यारोहण अशा अनेक आघाडय़ांवर महिला विविधांगी काम करताना दिसत आहेत.. त्यांचा प्रवास मागून येणाऱ्या अनेकींसाठी प्रेरणा देणारा आहे. अशाच काही महिलांची आणि त्यांच्या कामाची महिला दिनानिमित्त ही ओळख.

वाद्यवृंदसूर तेच छेडिता..

महिला कलाकारांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देणे आणि त्या बरोबरीने सामाजिक बांधिलकी जपणे अशा उद्देशाने काही काम करता येईल का, या विचारात असताना माझी मैत्रीण आणि निवेदिका रंजना काळे आणि मी सूरसखी या कल्पनेपर्यंत येऊन पोहोचलो. साधारणपणे वाद्यवृंद म्हटलं की महिला आणि पुरुष कलाकारांचा एकत्रित वाद्यवृंदच आपण पाहिलेला असतो, पण गायन, वादन आणि निवेदन अशा तिन्ही आघाडय़ा सांभाळणाऱ्या महिलांचा वाद्यवृंद म्हणून सूरसखी या वाद्यवृंदाची निर्मिती आम्ही केली, असं गायिका मानिनी गुर्जर सांगतात. सप्टेंबर २०१७ मध्ये अनुराधा पटवर्धन, देवयानी सहस्रबुद्धे आणि मी गायन, किमया काणे, संपदा देशपांडे, उमा जटार, शिल्पा आपटे, भावना टिकले, ऊर्मिला भालेराव यांचे वादन आणि रंजना काळे यांचे निवेदन असा मेळ जमून आला आणि हा वाद्यवृंद सुरू झाला. हिंदी सिने संगीतातील फीमेल डय़ूएट गाण्यांचा ‘कजरा मोहब्बतवाला’ हा कार्यक्रम आम्ही सादर करतो. यात स्वरमंचावर गायन, वादन आणि निवेदन अशा तिन्ही जबाबदाऱ्या महिलांद्वारे पेलल्या जातात. स्नेहालय, स्नेहाधार, श्वेता असोसिएशन या संस्थांसाठी आम्ही ‘कजरा मोहब्बतवाला’ हा कार्यक्रम सूरसखीतर्फे सादर केला आहे. तीस ते पंचावन्न वर्षे वयोगटातील संगीत अलंकार आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या महिला कलाकारांचा या वाद्यवृंदामध्ये समावेश आहे. स्नेहालय या समाजसेवी संस्थेसाठी मदत निधी उभा करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करून त्यातून दीड लाख रुपयांची मदत संस्थेला करता आली, सूरसखीसाठी हा समाधानाचा म्हणता येईल असा क्षण आहे.

गिर्यारोहण : इशानीची उत्तुंग भरारी

गिर्यारोहण म्हणजे पुरुषांच्या वर्चस्वाचे क्षेत्र असे वाटणाऱ्या सगळ्यांसाठीच इशानी सावंतचं उदाहरण अभिमान वाटायला लावणारं आहे. गिर्यारोहण आणि रॉक क्लायम्बिंगच्या क्षेत्रात जागतिक  स्तरावरील चार आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवणारी महाराष्ट्रातली सर्वात लहान वयाची मुलगी असाही तिचा लौकिक आहे. सहाव्या वर्षांपासून इशानीने तिच्या मामाबरोबर गिर्यारोहणाची वाट धरली. नवव्या वर्षी इशानीने पहिल्यांदा हिमालय पाहिला आणि त्यानंतर ती सातत्याने हिमालयात जात राहिली. हिमालयाबरोबरच देश-विदेशातील अनेक शिखरांवर तिने चढाई केली आहे. गिर्यारोहण आणि अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स शिकवणं हा तिच्या अत्यंत आवडीचा भाग आहे, त्यामुळेच अपंगांनाही अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट शिकवण्याचं काम ती करते. अमेरिका, इंग्लंड, थायलंड, फ्रान्स या देशांमधून इशानीने गिर्यारोहणाचे अभ्यासक्रम पूर्ण करून त्यातील प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत. सध्या दुबईमध्ये तिथल्या लहानांना, मध्यमवयीन नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गिर्यारोहण आणि अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टचे धडे देण्याचं काम ती करते. विशेष म्हणजे दुबईतील शारजा शहरातील राजकन्येला कयाकिंग शिकवण्याची संधीही इशानीला नुकतीच मिळाली. इशानीची आई सांगते, गिर्यारोहण क्षेत्रात करिअर करण्यासाठीही आवश्यक अभ्यास तिने पूर्ण केला आहे. गिर्यारोहणाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अनेक मुलींसाठी ती आदर्श ठरते आहे.

संशोधन क्षेत्र : डॉ. मधुरा यांचे योगदान

डॉ. मधुरा विप्र या बायोटेक्नॉलॉजिस्ट असून डेटा सायन्स हा त्यांच्या कामाचा भाग आहे. कॅन्सर बायॉलॉजी या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी पी. एचडी. पूर्ण केली आहे. गेली २८ वर्ष त्या शरीरशास्त्र आणि आरोग्यविषयक क्षेत्रात संशोधन करतात. विविध आजार, त्यांचे स्वरूप आणि व्याप्ती यांचा विचार करता ते आजार झालेल्या रुग्णांचा डेटा एकत्र करून त्यावरून आरोग्याविषयी अंदाज बांधले जातात, याला प्रिसिजन मेडिसिन असं म्हटलं जातं. डॉ. विप्र सांगतात, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे असलेल्या एका विख्यात क्लिनिकमध्ये रुग्णांच्या डेटावर आधारित नॉलेजबेसची निर्मिती करण्यात आली आहे. त्यावर आधारित एखाद्या रुग्णाचे भविष्यातील संपूर्ण हेल्थ स्टेटस, आपल्याकडच्या भाषेत सांगायचं तर हेल्थ कुंडली तिथले डॉक्टर सांगू शकतात. मानवी शरीरातील जीन्सचा अभ्यास करून ते जीन्स विशिष्ट आजाराला तारक आहेत की मारक हेही या संशोधनातून सांगता येतं. आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये सध्या अशा प्रकारच्या प्रिसिजन मेडिसिनवर संशोधन होत असून भारतातून त्यासाठी योगदान देणाऱ्या नावांमध्ये डॉ. विप्र यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. डॉ. विप्र सांगतात, आपली लोकसंख्या आणि  आढळणारे विविध आजार यांचा विचार करता भारतामध्ये या संदर्भातील संशोधनाला प्रचंड वाव आहे, मात्र त्यासाठी सरकारकडून भरीव आर्थिक तरतूद होण्याची गरज आहे.

उद्योग जगत : शीला धारियांचा ठसा

पुणे आणि देशाच्या संरक्षण क्षेत्राचा संबंध तसा जवळचा आणि जुना. एका पुणेकर महिलेचंही संरक्षण दलांच्या कामात एक महत्त्वाचं योगदान आहे. त्या महिलेचं नाव शीला धारिया. अनंत एंटरप्रायजेस या स्प्रिंग मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनीच्या त्या प्रोप्रायटर आहेत. बी. एससी. केमिस्ट्रीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करून त्या धारिया कुटुंबात आल्या. त्या सांगतात, माझं शिक्षण केमिस्ट्रीमध्ये झालं होतं आणि त्यातच पुढे शिकायचं माझ्या मनात होतं. पण माझ्या दिरांनी स्प्रिंगचा कारखाना सुरू केला  आणि संरक्षण विभागासाठी असेंब्लिंग आणि मशिनिंग कंपोनंट्स बनवण्याची संधी मिळाल्यामुळे ते तो कारखाना बघू शकत नव्हते. अशातच तो सांभाळायचं आव्हान माझ्याकडे चालून आलं आणि १९९८ मध्ये मी ते स्वीकारलं. हा उद्योग माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. त्यामुळे मी त्यात शिकत शिकत सुरुवात केली. तेव्हा मॅन्युअल मशिनवर आम्ही स्प्रिंग बनवत होतो. आज संपूर्ण आधुनिक यंत्रसामग्री उभी करून मी कारखाना अद्ययावत केला आहे. २००८ मध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी स्प्रिंग्ज तयार करण्याची मिळालेली संधी हा सर्वोच्च सन्मान आहे. २००८ मध्ये स्प्रिंग्जसाठी संरक्षण विभागाने विचारणा केली. १०० वेगवेगळ्या चाचण्या झाल्यानंतर २००९ मध्ये ऑर्डर मिळाली. मला सांगायला आनंद वाटतो, त्या प्रकल्पावर काम करताना काम करणाऱ्या तिन्ही अभियंत्या तरुण मुली होत्या. कामातली अचूकता, चांगला दर्जा यांच्या बळावर ब्राह्मोससाठी काम करण्याचं आव्हान पेलू शकलो.

First Published on March 8, 2018 4:40 am

Web Title: womens day 2018 womens are top in every field